लग्नापूर्वी एचआयव्ही चाचणी बंधनकारक करण्याच्या विचारात गोवा सरकार


पणजी : लग्नापूर्वी एचआयव्ही चाचणी करणे आता गोव्यात बंधनकारक होणार असून याबाबतीत कायदा करण्यासाठी सर्व कायदेशीर बाबी तपासल्या जात असल्याचे गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी स्पष्ट केले आहे.

एचआयव्हीचे प्रमाण गोव्यासारख्या छोटया राज्यातही वाढत असून राज्य सरकार त्याला आळा घालण्यासाठी एक नवीन कायदा करण्याचा विचार करत आहे. पती-पत्नी दोघांनीही लग्नाची नोंदणी करण्याआधी एचआयव्हीची तपासणी करुन घेणे बंधनकारक करण्याचे विधेयक लवकरच गोवा विधानसभेत सादर होणार आहे.

देशी-विदेशी पर्यटक गोव्यात मोठ्या संख्येने येत असतात. या राज्यात देहव्यापाराचे प्रमाणही जास्त असल्यामुळे एड्सचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे. राज्य सरकार याचाच विचार करुन लग्नाची नोंदणी करण्यासाठी एचआयव्ही चाचणी बंधनकारक करण्याचा विचार करत आहे.

एचआयव्हीसोबतच राज्य सरकार लग्नाआधी थॅलेसेमियाची चाचणी करणेही बंधनकारक करण्याचा विचार करत आहे. या कायद्याचे 100 टक्के मी समर्थन करत आहे. एचआयव्ही आणि थॅलेसेमिया या दोन्ही चाचण्या गोव्यात लग्नाआधी बंधनकारक करणे गरजेचे आहे, असे मत आपले असल्याचे विश्वजीत राणे यांनी म्हटले आहे.

Leave a Comment