पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार ऋतिक-दीपिका


सध्या जुन्या चित्रपटांच्या रिमेकचा ट्रेण्ड बॉलिवूडमध्ये सुरू असून प्रेक्षकांना आत्तापर्यंत बऱ्याच चित्रपटांचे रिमेक पाहायला मिळाले. तर काही चित्रपटांचे सिक्वलही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचा आघाडीचा दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि फराह खान यांनी एकत्रित येऊन एका चित्रपटाच्या रिमेकची घोषणा केली होती. ऋतिक रोशन आणि दीपिका पादुकोण या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

फराह खान आणि रोहित शेट्टी यांनी अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी अभिनीत ‘सत्ते पे सत्ता’ या चित्रपटाचा रिमेक बनवण्याची घोषणा केली होती. या चित्रपटाच्या माध्यमातून ऋतिक आणि दीपिकाची जोडी पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहेत. या चित्रपटासाठी सुरुवातीला शाहरुख खान, अक्षय कुमार आणि सलमान खान यांच्या नावांची चर्चा सुरू होती. पण यासंदर्भात एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटासाठी ऋतिक आणि दीपिकाची निवड झाल्याचे सांगण्यात येत असल्यामुळे पहिल्यांदाच ही जोडी एकत्र पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे.

अलिकडेच आपल्या आगामी ‘छपाक’ चित्रपटाचे शूटिंग दीपिकाने पूर्ण केले आहे. तर, ती रणवीर सिंहसोबत ‘८३’ या चित्रपटातही झळकणार आहे. ती या चित्रपटानंतर ‘सत्ते पे सत्ता’ चित्रपटाच्या रिमेकची शूटिंग करणार आहे. फराह खानसोबत हा तिचा तिसरा चित्रपट असणार आहे. तर, दुसऱ्यांदा रोहित शेट्टीसोबत ती काम करणार आहे. या चित्रपटाची निर्मिती रोहित शेट्टी करणार आहे. तर, दिग्दर्शन फराह खान करणार आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment