ब्रिटीश राजघराण्याच्या महालात राहू शकणार पर्यटक


इंग्लंडचे प्रिन्स चार्ल्स यांनी दोन महिन्यापूर्वी त्यांच्या स्कॉटलंड मधल्या कॅथेनीज गावातील रॉयल पॅलेस मध्ये लॉजिंग सुरु केले असून या महालात आता आम जनता राहू शकणार आहे. महालातील जीवनाचा आनंद यामुळे पर्यटक घेऊ शकतील. मुळात या भागात पर्यटनाला प्रोत्साहन मिळावे यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या महालात प्रवाश्यांना राहणे आणि नाश्ता दिला जाणार आहे. त्यासाठी येथे एक रेस्टॉरंट सुरु करण्यात आले आहे.


या महालातील १० खोल्या पर्यटकांना राहण्यासाठी उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. १५ मे पासून लॉजिंग सुविधा सुरु झाली आहे. नागरिकांकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे असे समजते. महालाचे व्यवस्थापक सिरले फारक्यूहर म्हणाले ब्रिटनच्या राजपरिवाराला हा प्रदेश खूप अभिमानाचा आहे आणि म्हणून येथे ग्रेनरी लॉज उघडण्याचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे स्थानिक लोकांना वर्षभर रोजगार मिळणार आहे आणि अर्थव्यवस्थेला फायदा होणार आहे.


या महालात डबल रूमसाठी १ रात्रीचा चार्ज १४५ पौंड म्हणजे १२५०० रुपये आहे तर सुपर किंग डबलसूटसाठी १५५ पौंड भाडे आकारले जाईल. पर्यटकाना या निवासात ब्रेकफास्ट दिला जाईल आणि ते कॉमनरूमचा वापरही करू शकतील. १५६६ ते १५७२ या काळात हा महाल बांधला गेला असून तो क्वीन एलिझाबेथ यांनी खरेदी केला आहे. राजपरिवार सुट्टी घालविण्यासाठी येथे अनेकदा येतो.

या महालात ३८ खोल्या असून त्यात १५ बेडरूम आहेत. तीन स्वागतकक्ष आहेत. एक सुंदर लायब्ररी आणि बिलीयर्ड रूमसुद्धा आहे. महालाभोवती सुंदर बगीचा असून तो विशेष वेळी खुला केला जातो.