टीम इंडियासाठी बनली खास वर्ल्ड कप बनारसी साडी


इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत विजयाची गुढी टीम इंडियाने उभारावी यासाठी देशभरातील क्रिकेटप्रेमी सदिच्छा देत आहेत. मंदिरे, देवळातून वर्ल्ड कप ट्रॉफी टीम इंडियाला मिळावी यासाठी प्रार्थना, नवस बोलले जात आहेत. बनारस मधील साडी व्यापारी आणि डिझायनर सर्वेश कुमार याला अपवाद नाहीत. ते नुसते क्रिकेटप्रेमी नाहीत तर स्वतः क्रिकेट खेळणारे आहेत. वर्ल्ड कप मध्ये टीम इंडिया विजयी व्हावी म्हणून सर्वेशकुमार श्रीवास्तव यांनी बनारसी साडीचा सुंदर नमुना तयार केला असून टीम इंडिया मधील सर्व १६ खेळाडूना या खास साड्या गिफ्ट म्हणून दिल्या जाणार आहेत. म्हणजे क्रिकेटपटूंची नाही तरी क्रिकेटपटूंच्या पत्नी, मैत्रिणी यांना खास भेट मिळणार असे म्हटले तर चुकीचे नाही.

सर्वेशकुमार यांनी त्यांचे खास विणकर मुबारक अली यांच्याकडून ही खास साडी विणून घेतली आहे. हा मास्टर पीस तयार करण्यासाठी एक महिना लागला आणि त्यासाठी ५० हजार रुपये खर्च आला. आता या नमुन्यांवरून बाकीच्या १५ साड्या विणल्या जातील आणि त्यासाठी प्रत्येक साडीला २० हजार रुपये खर्च येईल असे समजते.


बनारस कलेसाठी प्रसिद्ध आहेच. आता येथे ही अनोखी वर्ल्ड कप साडी तयार झाली आहे. प्युअर सिल्कमध्ये बनलेली ही साडी साडेपाच मीटर लांबीची असून त्यावर ४०० पेक्षा अधिक वर्ल्ड कप लोगो व छोट्या चेंडू बॅटीचे डिझाईन बुट्टे स्वरुपात विणले गेले आहे. हे बुट्टे जरीचे आहेत. साडीला काठ जरीचा असून पूर्ण पदरावर वर्ल्ड कप लोगो सह आयसीसी २०१९ अशी अक्षरे विणली गेली आहेत.


टीम इंडियाचा अंतिम मुकाबला कुणाशी होणार याची देशभर उत्सुकता आहे. टीमला कुणाची दृष्ट लागू नये म्हणून काशीचा कोतवाल कालभैरव याची विशेष पूजा केली गेली आहे. विजयासाठी सर्वेश कुमार यांनी खास साडी नमुना तयार केला आहे. साडी टीम इंडियाच्या जर्सीच्या रंगाची म्हणजे निळी असून वर्ल्ड कप लोगो आणि बॅटबॉलच्या ४५ लाईन्स त्यावर विणल्या गेल्या आहेत. पदरावर १० मोठे लोगो आहेत. नमुना साडी तयार झाल्यावर आता मागावर सहा साड्यांचे विणकाम सुरु केले गेले आहे. त्यानंतर पुन्हा चार व नंतर बाकी सहा अश्या १६ साड्या विणल्या जाणार आहेत. ही साडी वजनाला हलकी आहे आणि दिसायला अतिशय सुंदर बनली आहे.

Leave a Comment