माजी क्रिकेटपटू आणि आता दिल्लीचा भाजप खासदार गौतम गंभीर याने त्याला खासदार असल्याचा मिळणारा सर्व पगार लोकोपयोगी कामांसाठी खर्च करणार असल्याची घोषणा केली असून त्या दृष्टीने तो कामाला लागला आहे. दर महिन्याला मिळणाऱ्या या वेतनातून तो दिल्ली पूर्व भागातील सर्व स्मशानघाट दुरुस्ती आणि सोयीसुविधा करण्यासाठी खर्च करणार असून त्याची सुरवात सर्वात जुन्या आणि प्रमुख घाट असलेल्या गीता कॉलनीपासून केली गेली आहे. गौतमच्या निकटवर्ती कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार गौतमने नुकताच या सर्व भागाचा दौरा केला आणि स्मशान घाटांची पाहणी केली.
गौतम गंभीर खासदारकीचा पगार लोकोपयोगी कामांसाठी वापरणार
या भागात पर्यावरणवाद्यांच्या मदतीने हिरवळ लावण्याचा प्रयत्न गौतम करत आहे. त्याने त्यांचे मुख्य लक्ष स्मशान घाट सफाई व्यवस्थेवर केंद्रित केले आहे. त्यात आवश्यक दुरुस्त्या, लाकडे ओली होऊ नयेत म्हणून शेड, पाणीपुरवठा, नवीन ओटे, मृत नातेवाईकांना बसण्यासाठी पुरेशी बाके यांचा समावेश आहे. गौतमने त्याच्या अधिकृत ट्विटर अकौंटवरून खासदार म्हणून मिळणारा सर्व पगार डोनेट करणार असल्याचे जाहीर केले असून मतदारसंघातील सर्व कामे पूर्ण करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
गौतम म्हणतो राजकारण हे माझ्या शहरवासीय नागरिकांसाठी मदत करण्याचे एक माध्यम आहे. खासदार म्हणून मिळणाऱ्या प्रत्येक पैशाचा उपयोग मतदार संघातील नागरिकांचे जीवन अधिक चांगले करण्यासाठी करणार आहे. स्मशानघाट दुरुस्ती हा त्याचाच एक आवश्यक भाग आहे.