सौंदर्यप्रसाधने, खाद्य उत्पादने किंवा कोणतीही एफएमसीजी वस्तू आपण बाजारातून किंवा मॉलमधून खरेदी करताना त्या उत्पादनाची पॅकिंग, कालबाह्यता तारीख, प्रमाणपत्र प्रमाणीकरण, किंमत अशा सर्व गोष्टी तपासूनच खरेदी करतो. पण सध्याच्या घडीला बाजारात अनेक प्रकाराची डुप्लिकेट उत्पादने आली आहेत जी आपल्या ओळखणे अशक्य गोष्ट आहे. आता त्यावरच पर्याय म्हणून भारत सरकार, ग्राहक व्यवहार विभाग आणि अन्न सुरक्षा व मानदंड प्राधिकरण (FSSAI) यांनी आता स्वयंसेवी संस्थेद्वारे एक अॅप तयार केले आहे. या अॅपचे नाव ‘स्मार्ट कंझ्युमर’ (Smart Consumer) असे असून, याद्वारे ग्राहकांना उत्पादनांबद्दल अचूक माहिती मिळण्यास मदत नक्कीच होईल. त्याच अॅपबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया त्या अॅपबद्दल…
आता एका क्लिकवर मिळणार उत्पादन डुप्लिकेट असल्याची माहिती
सर्वात आधी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरुन स्मार्ट कंझ्युमर अॅप डाउनलोड करावे लागेल. पण अॅप डाऊनलोड करताना ज्या अॅपखाली जीएस1 (GS1) लिहिले असेल तेच डाऊनलोड करा. हे अॅप अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे. उत्पादनाच्या मागील बाजूस दिलेल्या बारकोड हे अॅप स्कॅन करते.
अॅप सुरु केल्यावर ज्या उत्पादनाबद्दल आपण जाणून घेऊ इच्छिता, त्या उत्पादनाचा कोड स्कॅन करा. जर उत्पादनावर बारकोड नसेल तर बारकोड (जीटीआयएन) वर लिहीलेला नंबर प्रविष्ट करा. स्कॅन केल्यानंतर त्या उत्पादनाबद्दलची सर्व माहिती आपणाला दिसेल. यात निर्माता, किंमत, तारीख, FSSAI परवाना यासारखी माहितीही असेल. अशा प्रकारची माहिती जर तुम्हाला मिळाली नाही तर समजावे, उत्पादकाने ही माहिती दिली नाही याचा अर्थ ते उत्पादन बनावट आहे. तर अशा प्रकारे तपासून खरेदी केल्याने तुमच्या आहारात अथवा जीवनशैलीमध्ये कोणत्याही प्रकारची बनावट अथवा भेसळयुक्त उत्पादने असणार नाहीत.