कर्नाटक; काँग्रेसच्या २२ तर जेडीएसच्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे


बंगळुरु – कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सत्ताधारी आघाडीतील काँग्रेस २२ आणि जेडीएसच्या सर्व आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे कर्नाटकातील आघाडी सरकारला कॅबिनेट मंत्र्यांचे पुनर्खातेवाटप करणे शक्य होणार आहे. तसेच, पुन्हा मंत्रिमंडळात याआधी राजीनामा देणाऱ्या बंडखोर नेत्यांनाही समाविष्ट करून घेता येणार आहे. आमदारांच्या राजीनाम्यांची घोषणा सिद्धरामय्या आणि के. सी. वेणुगोपाल यांनी केली आहे.

त्यातच अपक्ष आमदार आणि मंत्री नागेश यांच्यासह आर. शंकर यांनी राजीनामा दिला आहे. तर आपण काँग्रेसच्या व्यवहारामुळे नाराज असून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे काँग्रेसचे नेते रोशन बेग यांनी सांगितले आहे. याचबरोबर मुंबईहून काँग्रेसचे विद्रोही आमदार गोव्याला रवाना झाले आहेत. दरम्यान काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली असून राजीनामा दिलेल्या आमदारांवर कायदेशीर काय कारवाई करता येईल यावर चर्चा चालु असल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या राजीनाम्याची मागणी कर्नाटकचे आघाडी सरकार अल्पमतात आल्याने भाजपकडून करण्यात आली आहे. भाजप नेत्या शोभा करंदलाजे यांनी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. तसेच काँग्रेसचे नेते आणि कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अन्य भाजप नेत्यांनीच कुमारस्वामी सरकार पाडण्याची खेळी रचल्याचा आरोप केला आहे.

Leave a Comment