या नव्या योजनेमुळे 10 मिनिटांपेक्षाही कमी वेळेत मिळेल ई-पॅन कार्ड


मुंबई : सध्या रिअल टाईम बेसिसवर ई-पॅन जारी करण्यासाठीच्या एका प्रक्रियेवर आयकर विभाग काम करत असून याबद्दलची माहिती सोमवारी संसदेत देण्यात आली. एका प्रश्नाला अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिलेल्या उत्तरानुसार, रियल टाईम पॅन/टॅन प्रोसेसिंग सेंटर सुरु करण्याच्या विचारात आहे, जेणेकरुन 10 मिनिटांपेक्षाही कमी वेळेत आधार बेस्ड ई-केवायसीच्या माध्यमातून पॅनकार्ड जारी केले जाईल.

आयकर विभागाला अजून मजबूत करण्याच्या दृष्टीकोणातून तंत्रज्ञानात सुधारणा करण्यासाठी अनेक प्रस्तावांची सुरुवात केली असल्याचेही अनुराग ठाकूर यांनी सांगितले. करदात्यांना या प्रक्रियेमुळे सोयीचे होईलच, शिवाय मोठ्या प्रमाणात वेळेचीही बचत होईल. याच प्रक्रियेअंतर्गत पॅन कार्ड काढण्यासाठी लागणारा वेळ वाचवण्यासाठी आयकर विभाग रिअल टाईम बेसिसवर पॅन-टॅन सेंटरवर काम करत आहे. अर्ज करणाऱ्या अर्जदारांना आधार बेस्ड ई-केवायसीच्या माध्यमातून याचा फायदा होईल.

टॅक्स डिडक्शन अँड कलेक्शन अकाऊंट नंबर (10) एक 10 अंकी अल्फान्युमरिक नंबर आहे. हा नंबर केंद्र सरकारला कर देताना प्रत्येक करदात्याला सांगणे अनिवार्य असते. पॅन हा देखील एक 10 अंकी अल्फान्युमरिक नंबर असतो, जो आयकर विभागाकडून जारी केला जातो.

यंदाच्या अर्थसंकल्पात करदात्यांच्या सोयीसाठी फक्त आधार कार्डवरही काम होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. पण पॅन कार्ड धारकांची संख्या या योजनेमुळे वाढू शकते. पॅन कार्ड काढण्यासाठी एजंटकडून मोठ्या प्रमाणात लूट केली जाते, कागदपत्रांची जुळवाजुळव, त्यात महिनाभर वाट पाहणे यामुळे अनेक जण पॅन कार्ड न काढणेच पसंत करतात.

Leave a Comment