निसर्गनियमानुसार जगणारी अरुणाचलची झिरो व्हॅली


जगभरात निसर्गनियमानुसार जगणाऱ्या लोकांच्या ज्या काही हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या जागा आहेत त्यातील एक आहे अरुणाचल प्रदेशमधील झिरो व्हॅली. समुद्रसपाटीपासून ५६०० फुट उंचावर असलेल्या या व्हॅली मध्ये आजही प्रकृती आणि परंपरा कायम राहिल्या आहेत. या भागात आजही कोणतेही मशीन अथवा पशुचा वापर न करता शेती केली जाते आणि शेतीची ही जबाबदारी पूर्णपणे महिलांच्या खांद्यावर आहे. या महिला हातानेच शेतीची सर्व कामे करताच पण एक दुसरीच्या शेतात मदतीला सुद्धा जातात. येथे नदीतून जे पाणी घेतले जाते ते नदीला परत करण्याची प्रथा पाळली जाते.


या भागात अपतिनी जमातीचे लोक राहतात. यात कुटुंबप्रमुख महिलाच असतात. नाकात दोन्ही बाजूला मोठ्या बटनांसारखे दागिने घातलेले असतात आणि डोक्यापासून अंगावर सर्वत्र गोंदवण असते. पाण्याची बचत येथे कसोशीने केली जाते. पाण्याचा थेंब न थेंब येथे वापरला जातो. येथे प्रत्येक शेतात पाण्याचा कालवा आणला जातो. या कालव्याची देखभाल प्रत्येकाला करावी लागते असा नियम येथे आहे.


शेतीसाठी आणलेल्या छोट्या पाण्याच्या पाटात मत्स्यपालन केले जाते. मासे जे बाहेर टाकतात ते सर्व शेतात टाकले जाते. इतकेच नाही तर घरातील कचरा, भाजीपाल्याची देठे, फळांची साले, झाडांची पाने सर्व शेतात जिरविले जाते. कोंबड्या डुकरे यांचे अवशेष, घरातील राख सुद्धा शेतात जिरविले जातात. यामुळे अपोआप सेंद्रिय पदार्थ तयार होतात आणि शेतातील पिके जोमदार येतात. आज शेकडो वर्षे याच पद्धतीने येथे शेती केली जात आहे.


या भागात उपलब्ध जमिनीच्या ४८ टक्के जमिनीवर भातशेती केली जाते. ३३ टक्के जमीन जंगल आहे, १७ टक्के जमिनीवर बांबू बने आहेत तर २ टक्के जमिनीवर रहिवाशांची घरे आणि बागा आहेत. त्यात किवी पासून अनेक प्रकारची फळे येतात. येथे प्रती हेक्टर भात उत्पादन अन्य भागांपेक्षा ३ ते चार पटीने अधिक होते.


हे आदिवासी जमातीचे लोक असले तरी आधुनिक संगीत आणि पारंपारीक संगीताचा आस्वाद घेणारे आहेत. दर सप्टेंबर मध्ये येथे म्युझिक फेस्टिव्हल होतो आणि स्थानिक तसेच अन्य प्रांतातून येथे कलाकार त्यांची कला सादर करतात. येथे शाळांमधून झिरो वेस्ट कार्यक्रम राबविला जातो. तुमचे खोरे ग्रीन आणि क्लीन ठेवा असा संदेश मुलांना लहान वयापासून दिला जातो. या भागात भात शेती मोठ्या प्रमाणावर होते. भाते पिकली कि या हिरव्या सुंदर प्रदेशावर सोन्याचा पिवळा रंग चढतो. त्यामुळे या भागाला गोल्डन व्हॅली असेही म्हटले जाते.

Leave a Comment