६० वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अंतराळात जाणार ८० वर्षाच्या वॅली फंक


एखादा माणूस आपले स्वप्न पुरे व्हावे म्हणून किती वर्षे प्रतीक्षा करू शकेल याचा अंदाज वर्तविणे कठीण आहे. मात्र स्वप्न उशिरा का होईना प्रत्यक्षात उतरण्याचे समाधान वेगळेच असणार हे नक्की. याचा अनुभव ८० वर्षीय वॅली फंक घेत आहेत. त्यांनी गेली ६० वर्षे अंतराळ प्रवासाची केलेली प्रतीक्षा आता पूर्ण होत असून त्या व्हर्जिन गॅलेक्टिकच्या पहिल्या स्पेस टूर मध्ये सामील होत आहेत. स्वप्नपूर्ती साठी वॅली यांनी अविवाहित राहण्याचा निर्णय तरुणपणीचा घेतला होता. कारण अंतराळात जावे लागले तर मुलेबाळे, कुटुंब यांची जबाबदारी टाकून जाता येणार नाही असे त्यांना वाटत होते. त्याच्या या संघर्षाची कथा वॅली फंक्स रेस फोर स्पेस, एक्स्ट्राओर्डीनरी जर्नी ऑफ ए फिमेल एव्हीएशन पायोनियर या पुस्तकात सांगितली गेली आहे.


आज वॅली ८० वर्षाच्या आहेत पण त्यांच्या उत्साहात हे वय कुठेच आड आलेले नाही. त्यांनी १ कोटी ४० लाख रुपये खर्चून व्हर्जिन कंपनीच्या स्पेस टूरचे तिकीट घेतले आहे. वॅली नऊ वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांनी पहिला फ्लाईंग क्लास सुरु केला होता. त्यांना फ्लाईंगची इतकी आवड कि त्या सतत लाकडी विमाने बनवीत असत. मिसुरी स्टीफन कॉलेज मधून त्यांना उड्डाण परवाना मिळाला त्यानंतर त्यांनी विमान उडविले.


ओक्लाहोमा विद्यापीठ एव्हीएशन टीम मध्ये त्या सामील झाल्या तेव्हा त्या एकमेव महिला होत्या, बाकी पुरुष होते. १९५९ साली नासाने प्रोजेक्ट मर्करी १३ लाँच केला त्यासाठी खासगी कंपनीने पैसे पुरविले होते आणि पुरुषांसोबत महिलांना संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती. तेव्हा त्यात वॅली यांचा समावेश झाला. त्यावेळी त्या २२ वर्षाच्या होत्या आणि या प्रोजेक्ट मध्ये २५ ते ४० वयोगटाची अट होती. पण तरीही वॅली यांच्या फ्लाईंगचा अनुभव लक्षात घेऊन त्यांची निवड झाली. कानात बर्फाचे पाणी, विजेचे झटके अश्या काही कडक चाचण्या झाल्या आणि जायची वेळ आली तेव्हा हा प्रोग्राम रद्द केला गेला. या प्रोग्राममध्ये महिला नकोतच अशी भूमिका घेतली गेली तेव्हा वॅली यांना आपल्याला महिला म्हणून फसविले गेल्याची भावना सतावत होती.

इतके घडले तरी वॅली यांनी हिम्मत हरली नाही. त्यांच्या फ्लाईंगचे अनुभव, त्यांचे यश त्या सतत नासाला पत्राने कळवीत राहिल्या. १९७१ मध्ये फेडरेशन एव्हीएशन अॅथोरिटी मध्ये त्या पहिल्या महिला इंस्ट्रक्टर बनल्या आणि आजही त्या फ्लाईंग इंस्ट्रक्टर म्हणून सेवा देत आहेत. आता ६० वर्षानंतर त्यांचे अंतराळ प्रवास स्वप्न खरे होण्याची वेळ आली आहे.

Leave a Comment