कपिलदेवला लागला रणवीरचा गुण


रणवीरसिंग याने तो ८३ या चित्रपटात साकारत असलेल्या कपिल देव यांच्या भूमिकेतील लुक त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने शेअर केला असून यात तो हुबेहूब कपिल देव यांच्यासारखा दिसत आहे. त्याबद्दल त्याचे आणि त्याचा मेकअप करणारे प्रसिध्द रंगभूषाकार विक्रम गायकवाड आणि त्याच्या टीमचे कौतुक होत आहे. मात्र याचवेळी कपिल देव यांचा आणखी एक फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून त्यामुळे कपिल देव यांना रणवीरचा वाण नाही पण गुण लागल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. परिणामी लोकांनी फोटोवर प्रतिक्रियांचा पाउस पाडताना रणवीर कपिलच्या भूमिकेत तर कपिल देव रणवीरच्या बायोपिक मध्ये भूमिका करत असल्याचे आणि दोघांच्या भूमिकांची अदलाबदल झाल्याचे म्हटले आहे.


रणवीर चित्रविचित्र कपडे घालण्यासाठी प्रसिद्ध आहेच. कपिल देव यांचा शेअर करण्यात आलेला फोटो असाच विचित्र कपड्यातील आहे. त्यात कपिल लाल भडक रंगाचा टी शर्ट आणि लाल, निळ्या, पांढऱ्या रंगांचे विचित्र डिझाईन असलेल्या पँट मध्ये दिसत आहेत. कपिल यांचा हा अवतार कधीच पहिला गेलेला नाही. हा फोटो हर्ष भोगले यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर केला असून त्या नंतर केलेल्या ट्विट मध्ये इंग्लंडचा माजी अष्टपैलू खेळाडू इयान बोथम चॅरीटी फाउंडेशनसाठी झालेल्या कार्यक्रमात हा टीमचा गणवेश होता असा खुलासा केला आहे. त्यामुळे अशी पँट कपिल आणि सौरव गांगुली यांनी घातली होती.


दरम्यान ‘ ८३ ‘ चित्रपटातील भूमिकेसाठी रणवीर खूप मेहनत घेतो आहे. १० दिवस कपिल देव यांच्या घरी मुक्काम टाकून त्याने त्यांच्या सोबत जेवणखाणासह कपिलदेव यांच्या अनेक लकबी आत्मसात केल्या आहेत शिवाय त्यांच्याच कडून बॅटिंग आणि बोलिंगचे धडे गिरविले आहेत. कपिल सारखी बॉडी बनविण्यासाठी रणवीरला स्पेशल कार्डीओ आणि पायांसाठी व्यायाम दिले गेले आहेत.


रणवीरला हुबेबुब कपिल बनविणारे मेकअप आर्टीस्ट विक्रम गायकवाड म्हणाले कपिल सारखे केस दिसावेत म्हणून स्पेशल विग तयार केला गेला तसेच फक्त नाकावर प्रोस्थेटिक वापरले गेले. कारण रणवीर ग्राउंडवर पळताना दिसणार आहे त्यावेळी त्याला मेकअप मुळे अभिनय करताना अवघड होता कामा नये याची काळजी घेतली. कपिलचे नाक जास्त शार्प आहे त्यामुळे फक्त नाकासाठी प्रोस्थेटिक वापरले गेले. विक्रम राष्ट्रीय अॅवॉर्ड विजेते रंगभूषाकार असून त्यांनी अनेक कलाकारांना अनोख्या रुपात सजविले आहे. हसताना कपिल यांचे दोन दात पुढे दिसतात, त्यासाठी रणवीरला स्पेशल डेंचर बसविले जात आहे. या चित्रपटातील सर्व कलाकारांसाठी स्पेशल बूट मशीन घेऊन बूट बनविले गेले आहेत. त्याकाळी क्रिकेटर लेदर सोल असलेले बूट वापरत असत. मात्र आजकाल तसे बूट बनत नाहीत.

Leave a Comment