वायएसआर काँग्रेसची चंद्राबाबूंकडे सरकारी निवासस्थान खाली करण्याची मागणी


अमरावती : आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलुगु देसम पार्टीचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांच्या मागे लागलेले शुक्ल काष्ठ काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. त्यातच आता सत्ताधारी वायएसआर काँग्रेसने एन. चंद्राबाबू नायडू यांच्याकडे सरकारी निवासस्थान खाली करण्याची मागणी केली आहे. वायएसआर काँग्रेसचे आमदार अल्ला रामकृष्णा रेड्डी यांनी सांगितले की, अवैध घरात राहत असल्याची नैतिक जबाबदारी एन. चंद्राबाबू नायडू यांनी स्वीकारली पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी कोणताही वादविवाद न करता सरकारी निवास्थान खाली केले पाहिजे.

मंगलागिरी मतदारसंघाचे अल्ला रामकृष्णा रेड्डी हे आमदार आहेत. अल्ला रामकृष्णा रेड्डी म्हणाले, निवासस्थान तेलुगु देसम पार्टीचे अध्यक्ष खाली करणार नसतील, तर आंध्र प्रदेश शहर विकास प्राधिकरणाकडे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी तक्रार करणार आहे. 6 मार्च, 2016 रोजी विधानसभेत एन. चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले होते की, निवासस्थान सरकारी असल्यामुळे निवासस्थान खाली करण्यास एन. चंद्राबाबू नायडू बांधील असल्याचेही अल्ला रामकृष्णा रेड्डी यांनी सांगितले.

चंद्राबाबू नायडू यांचा अमरावती येथील ‘प्रजा वेदिका’ नावाचा बंगला गेल्या महिन्यात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या आदेशानुसार जमीनदोस्त करण्यात आला होता. प्रजा वेदिका हा अवैधरित्या बांधलेला बंगला आहे. त्याचे कृष्णा नदीकाठी विनापरवाना निर्माण करण्यात आले असल्यामुळे नदी संवर्धन कायद्याचे उल्लंघन होत आहे. तेलुगु देसम पार्टीच्या मागील कार्यकाळात एन. चंद्राबाबू नायडू यांच्या निवासस्थानासमोर प्रजा वेदिकाचे निर्माण करण्यात आले होते, अशी माहिती मिळते.

Leave a Comment