सेनेवर दगडफेक करणाऱ्यांना नियंत्रणात आणणारी एमसीव्ही तयार


जम्मू काश्मीर भागात सेनेच्या जवानांवर दगडफेक करण्याच्या घटना अलीकडे वारंवार घडत आहेत. या गर्दीला नियंत्रणात आणणारे एक मजबूत वाहन (मॉब कंट्रोल व्हेइकल – एमसीव्ही) बंगालच्या दुर्गापूर येथील अभियांत्रिकी संस्थेत वैज्ञानिकांनी तयार केले आहे. या मुळे सेनेची ताकद वाढेल, दगफेकीत सैनिक जखमी होण्याच्या घटना कमी होतील शिवाय दगड्फेक्यांच्या त्रास देण्याच्या इराद्याला लगाम बसेल असा विश्वास व्यक्त होत आहे.

दगडफेक करणारे, किंवा दंगेखोर संख्येने जास्त असले तरी हे वाहन ते उलटवून टाकू शकणार नाहीत. त्याला आग लागणार नाही आणि दगडफेक होत असली तरी आतील जवान सुरक्षित राहतील. दुर्गापूर एमएमइआरआय मधील वैज्ञानिक या वाहनावर गेले ९ महिने काम करत आहेत. हे वाहन सप्टेंबर मध्ये तयार होत असून त्यानंतर ते लष्करात दाखल होईल.

वैज्ञानिक असा दावा करत आहेत, हे वाहन म्हणजे एखाद्या किल्ल्याप्रमाणे अभेद्य आहे. यात अनेक प्रकारचे कॅमेरे बसविले गेले आहेत. त्यामुळे वाहनाच्या आत बसलेले सैनिक बाहेरचे दंगेखोर पाहू शकतील आणि त्यांच्यावर योग्य कारवाई करू शकतील. या वाहनात उच्च दर्जाचे वाईड अँगल कॅमेरे बसविले गेले आहेत. ते १७० अंशातून परिसर पाहू शकतील आणि माहिती सैनिकांना देतील. यात व्हिडीओ ट्रान्समीशन सिस्टीम दिली गेली आहे. त्यामुळे लष्करी मुख्यालयातून अधिकारी संबंधित भागाचे निरीक्षण करू शकतील आणि वाहनातील जवानांना कारवाई संबंधी सूचना देऊ शकतील.

या वाहनातून गर्दीवर पाण्याच्या जोरदार फवाऱ्याचा वापर करता येईल तसेच अश्रुधूर सोडता येईल. या वाहनात आग विझविण्याची व्यवस्था केली गेली आहे. त्यासाठी खास फोम स्प्रे सिस्टीम बसविली गेली आहे. हे वाहन ताशी ३० ते ४० किमी वेगाने प्रवास करू शकेल आणि त्यात एकावेळी ८ सैनिक बसू शकतील. हे वाहन बनविण्यासाठी उच्च दर्जाचे पोलाद वापरले गेले आहे. त्याच्या पुढे लोखंडी भिंत असून उपद्रवी गर्दी वाहनाजवळ आली तर ही भिंत पुढे येईल आणि गर्दीला मागे लोटेल असे सांगितले जात आहे.

Leave a Comment