या कलाकाराने बनविला जगन्नाथाचा अडीच इंची रथ


ओरिसा मध्ये सध्या भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेचा सोहळा सुरु आहे. जगन्नाथ, सुभद्रा आणि बलभद्र यांचे महाप्रचंड रथ भाविक दोरीच्या सहाय्याने खेचत असतात आणि या यात्रेसाठी जगभरातून पर्यटक येतात. नऊ दिवस हा सोहळा साजरा होतो. ओरिसातील एक कलाकार सत्यनारायण मोहराना जगन्नाथाचे भक्त आहेत आणि त्यांनी त्यांची भक्ती अनोख्या मार्गाने जगन्नाथाला अर्पण केली आहे.

या ३५ वर्षीय कलाकाराने अडीच फुट उंचीचा भगवान जगन्नाथाचा रथ लाकडापासून बनविला आहे. त्यासाठी त्यांना चार दिवस लागले. या रथाला १६ चाके आहेत. रथात दीड इंच उंचीची सारथी प्रतिमा आहेच पण भगवान जगन्नाथाला बसण्यासाठी ०.२५ इंचाचे सिंहासन सुद्धा बनविले आहे. यासाठी त्यांनी कमीतकमी लाकूड, साल, कापड, पाणी आणि डिंक यांचा वापर केला. त्यांनी हा रथ रथयात्रेच्या निमित्ताने दाखविला तेव्हा त्यांच्या कौशल्याचे समाजाच्या सर्व थरातून खूप कौतुक झाले.


सत्यनारायण सांगतात, त्यांना जगन्नाथाचा रथ बनविण्याची इच्छा फार पूर्वीपासून होती. आता हे स्वप्न पुरे झाले आहे. ते जगन्नाथाचे परम भक्त आहेत आणि जगन्नाथानेच हे काम त्यांच्याकडून करून घेतले अशी त्यांची श्रद्धा आहे. सत्यनारायण पूर्वीपासून खडूवर कोरीव काम करून अनेक मूर्ती बनवितात. त्यांनी महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, माजी राष्ट्रपती प्रतीभाताई पाटील, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग अश्या अनेक नामवंतांच्या प्रतिमा खडूवर साकारल्या आहेत. त्यांच्या या कलेचे जगभरातून कौतुक झाले आहे. सत्यनारायण यांनी बनविलेला जगन्नाथाचा चिमुकला रथ त्यांच्याच घरी प्रदर्शनात ठेवला आहे. तो पाहण्यासाठी मोठी गर्दी होते आहे.

Leave a Comment