क्रिकेटप्रेमी रामकृष्णन यांचे क्रिकेट गणेश मंदिर


सध्या जगभरातून क्रिकेट रसिकांचे इंग्लंड मध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड कपकडे लक्ष लागले आहे. अंतिम लढतीची वेळ जवळ येत चालली आहे आणि त्यामुळे या स्पर्धेतील रोमांच वाढत चालला आहे. क्रिकेटवेडे त्यातही भारतातील क्रिकेट प्रेमी टीम इंडिया वर्ल्ड चँपियन बनावी अशी प्रार्थना करू लागले आहेत आणि त्यासाठी काही लोक देवाला नवस बोलू लागले आहेत.

तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथील रामकृष्णन सुद्धा याला अपवाद नाहीत. ते सच्चे गणेशभक्त आहेत. आणि क्रिकेटप्रेमीही. त्यांनी त्यांची आवड आणि भक्ती यांचा अनोखा संगम वेगळ्या प्रकारे घडवून आणला आहे. त्यांनी ते राहतात त्या अन्नानगर मधील न्यू अवाडी रोड वरच्या सोसायटीत चक्क क्रिकेट गणेश मंदिर उभारले आहे. हे मंदिर त्यांनी पूर्वीच बांधले असून त्यात क्रिकेट खेळतानाच्या फलंदाज आणि गोलंदाजाच्या विविध पोझ मधील गणेश मूर्ती आहेत.


२०११ मध्ये वर्ल्ड कप सुरु असताना त्यांनी विकेटकीपर गणेशाची मूर्ती सुद्धा स्थापन केली. त्यांच्या मते यामुळेच तेव्हा टीम इंडियाचा विकेट कीपर आणि कप्तान महेंद्रसिंग धोनी याची ताकद वाढली आणि हा वर्ल्ड कप भारताने जिंकला. रामकृष्णन सांगतात, १७ वर्षे ते मुंबईत नोकरी करत होते आणि गणेशाचे भक्त बनले. ते चेन्नईला राहायला आले तेव्हा त्याच्या सोसायटीजवळ एकही गणेश मंदिर नव्हते. म्हणून त्यांनीच मंदिर बंधण्याचे ठरविले आणि क्रिकेट प्रेम तसेच टीम इंडियाच्या खेळाडूना गणेशाचा आशीर्वाद राहावा म्हणून क्रिकेटच्या विविध पोझमधील गणेशमूर्ती स्थापन केल्या. या मंदिरात ११ मुखी गणेशाची मुख्य प्रतिमा असून ती टीम इंडियाचे प्रतिक आहे.

रामकृष्णन सांगतात, सचिन, कपिल देव, मोहिंदर अमरनाथ, के. श्रीकांत, राहुल द्रविड, विराट कोहली, धोनी, गौतम गंभीर, वीरेंद्र सहवाग, बुमराह यांच्यासाठी मी या गणेशाला नेहमीच प्रार्थना करत आलो आहे. हा गणेश या खेळाडूना नेहमीच मदत करतो आणि त्यामुळेच ते वर्ल्ड नंबर वन खेळाडू आहेत.


रामकृष्णन यांनी गणेश आरतीप्रमाणेच क्रिकेट गणेशाची आरती तयार केली आहे. दर चार वर्षांनी होणारा वर्ल्ड कप टीम इंडियाने जिंकावा यासाठी ते नेमाने या मंदिरात प्रार्थना करतात. त्यांनी आरतीबरोबरच क्रिकेट गणेशाची भजने तयार केली आहेत आणि एक मंत्र सुद्धा लिहिला आहे. या मंत्राचा ते १०८ वेळा जप करतात. या मंदिरात स्क्वेअर ड्राईव्ह मारणारा, बॉल स्विंग करणारा, स्पिनर, पॅड बांधून उभा असलेला विकेटकीपर अश्या गणेशाच्या अनेक मूर्ती आहेत. यंदाचा वर्ल्ड कप टीम इंडियाच जिंकणार अशी त्यांना खात्री आहे आणि त्यासाठी ते रोज या गणेशाची उपासना करत आहेत.

Leave a Comment