व्हेज ऐवजी नॉन व्हेज पाठवले म्हणून झोमॅटोला 55 हजारांचा दंड


पुणे : सध्या अनेक जण ऑनलाईन फूड डिलिव्हरी हा पर्याय वापरतात. अनेकांना बऱ्याच वेळा चुकीच्या ऑर्डरचा देखील सामना करावा लागतो. उपवासाच्या दिवशी तुम्ही खाणे ऑर्डर केले आणि तुम्हाला त्या दिवशी चिकन पाठवले तर काय कराल? शिवाय, तिच चूक एकदा ऑर्डर रद्द केल्यानंतर पुन्हा झाली तर? असाच काहीसा अनुभव नागपुरातील वकील शनमुख देशमुख यांना आला. त्यांनी उपवास असल्याने झोमॅटोवरून पनीर बटरची ऑर्डर दिली. पण, झोमॅटोने त्याऐवजी बटर चिकन पाठवले. त्याबाबत त्यांनी तक्रार केल्यानंतर ऑर्डर रद्द करून पुन्हा पाठवण्याचे रेस्टारंटने कबुल केले. पण, दुसऱ्यावेळी देखील बटर चिकन पाठवल्यामुळे ग्राहक न्यायालयाचा दरवाजा पेशाने वकील असलेल्या शनमुख देशमुख यांनी ठोठावला. त्या ठिकाणी त्यांना न्याय देखील मिळाला.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये शनमुख देशमुख हे वकिली करतात. 31 मे 2018 रोजी पुण्यात देशमुख आले होते. त्यांनी त्यावेळी उपवास असल्याने प्रीत पंजाबी स्वाद हॉटेलमधून पनीर बटरची ऑर्डर दिली. पण, त्याऐवजी बटर चिकन पाठवलं गेले. याबाबत त्यांनी झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला सांगितले. तेव्हा आम्ही केवळ डिलिव्हरी करण्याचे काम करतो असे उत्तर त्याने दिल्यामुळे देशमुख यांनी हॉटेलला फोनकरून तक्रार केली. हॉटेलने देखील तेव्हा माफी मागत ऑर्डर बदलून देण्याचे मान्य केल्यानंतर देखील पुन्हा तिच हॉटेलकडून झाल्यामुळे शनमुख देशमुख ग्राहक न्यायालयात दाद घेत 6 लाखांची मागणी केली.

शनमुख देशमुख यांच्या तक्रारीची दखल घेत ग्राहक न्यायालयाने झोमॅटोला 55 हजारांचा दंड ठोठावला. झोमॅटोच्या गुरूग्राममधील हेडऑफिस अथवा रेस्टारंटला हा दंड 45 दिवसामध्ये देण्याचा आदेश दिला. शिवाय दंड देण्यास उशीर झाल्यास दंडावर 10 टक्के व्याज द्यावे लागणार आहे. न्यायालयाने निर्णय देताना निष्काळजीपणासाठी 50 हजार आणि मानसिक त्रास देण्यासाठी 5 हजारांचा दंड ठोठावला आहे.

Leave a Comment