वाढदिवसाचे औचित्यसाधत रणवीर सिंहची चाहत्यांसाठी खास भेट


लवकरच ‘८३’ या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता रणवीर सिंह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘हरियाणा हरिक्केन’ म्हणून ओळखले जाणारे कपिल देव यांची भूमिका या चित्रपटात तो साकारत आहे. हा चित्रपट १९८३ साली झालेल्या क्रिकेट विश्वचषकावर आधारित असून आज रणवीरचा वाढदिवस आहे. रणवीरने तेच औचित्य साधत कपिल देव यांच्या रुपातील फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याच्या वाढदिवसाचे हे चाहत्यांना खास गिफ्टच म्हणता येईल.


भारतीय क्रिकेट संघाने १९८३ साली विश्वचषकावर आपले पहिल्यांदा नाव कोरले होते. पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर हाच थरार पाहायला मिळणार आहे. या चित्रपटासाठी रणवीरने बरीच मेहनत घेतली आहे. त्याने कपिल देव यांची भूमिका साकारण्यासाठी त्यांच्या घरी दिल्ली येथे १० दिवस राहून प्रशिक्षण घेतले.

रणवीरसोबत या चित्रपटात त्याची पत्नी दीपिका पादुकोण देखील झळकणार आहे. ती चित्रपटात कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे रिअल लाईफमधील पती पत्नीची जोडी ऑनस्क्रिन देखील पती पत्नीच्या रुपात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान हे करत आहे.

दरम्यान ट्विटरवर वाढदिवसाचा हॅशटॅग होत असून #HappyBirthdayRanveerSingh हा हॅशटॅग वापरून चाहते त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. सोशल मीडियावर रणवीरचे लाखो फॅन्स आहे. त्याच्या वाढदिवशीच त्याने त्याच्या आगामी ‘८३’ चित्रपटातील कपिल देव यांच्या रुपातील फर्स्ट लूक शेअर केला आहे. अवघ्या एका तासापूर्वी शेअर केलेल्या या फोटोवर आत्तापर्यंत ३ लाखापेक्षा जास्त चाहत्यांनी लाईक आणि कमेंट केले आहे. यावरुनच त्याच्या लोकप्रियतेचा अंदाज बांधता येईल.

यावर्षी त्याच्या ‘सिंबा’ आणि ‘गली बॉय’ या दोन्हीही चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवले. या दोन्हीही चित्रपटांचा समावेश १०० कोटी क्लबमध्ये झाला. आता लवकरच तो ‘८३’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तसेच करण जोहरच्या मल्टीस्टारर ‘तख्त’ चित्रपटातही तो झळकणार आहे.

Leave a Comment