नितेश राणेंच्या भूमिकेचे मनसेकडून समर्थन


मुंबई: मनसे सरचिटणीस आणि माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी रस्त्याच्या दुरावस्थेमुळे उपाअभियंत्यांवर चिखलफेक करणाऱ्या काँग्रेस आमदार नितेश राणे यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. नितेश राणे यांनी जे केले ते बरोबरच केले. त्याचबरोबर संदीप देशपांडे यांनी रस्ते दुर्घटनेस कारणीभूत ठरून हजारो बळी घेणाऱ्या इंजिनिअर्सवर कारवाई कधी करणार?, असा सवाल विचारला आहे.

इंजिनिअर्सना लाखो रुपये खाऊन कळणार नसेल तर ज्या भाषेत त्यांना कळते त्याच भाषेतच त्यांना समजवावे लागेल. सरकारने लवकरात लवकर नितेश राणे यांची सुटका करावी आणि कामचुकार इंजिनिअर्सवर कडक कारवाई करावी, अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली आहे.

मुंबई गोवा महामार्गाची गेल्या काही वर्षांपासून दुरावस्था झाली असल्यामुळे प्रचंड त्रासाला नागरिकांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आमदार नितेश राणे यांनी आक्रमक पवित्रा घेत उपअभियंत्याला धक्काबुक्की केली. आक्रमक झालेल्या नितेश राणेंनी उपअभियंते प्रकाश शेडेकर यांना पुलाला बांधण्याच्या प्रयत्न करुन, थेट हायवेवरील चिखलाने आंघोळ घातली. नितेश राणेंनी शेडेकर यांना शिव्यांची लाखोली वाहिली.

Leave a Comment