दुबईच्या राणीचे पलायन, ब्रिटनकडे केली आश्रय देण्याची मागणी


दुबईची राणी हया बिंत हुसैनने ब्रिटनमध्ये राजकीय आश्रय देण्याची मागणी केली आहे. हया हुसैन या दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल मख्तूम यांच्या पत्नींपैकी एक आहेत. मागील अनेक दिवसांपासून, हया यांनी शेख मोहम्मद यांना सोडले असून घटस्फोटाची देखील मागणी केल्याची माहिती समोर येत आहे. 45 वर्षीय हया बिंत हुसैन या गेल्या अनेक महिन्यांपासून आपल्या 11 आणि 7 वर्षीय मुलांना घेऊन लंडनला निघून गेल्या होत्या. तेव्हापासूनच त्या शेख जायद आणि शेखा अल जलीला या आपल्या मुलांबरोबर केस्गिंटन पॅलेसच्या जवळील एका भवनामध्ये राहत आहेत.

मागील महिन्यात झालेल्या एका शाही लग्न सोहळ्यात त्यांच्या अनुपस्थितीने त्या पळून गेल्याच्या देखील चर्चा सुरू झाल्या होत्या. राणी हया या शेख यांच्या सहा पत्नींपैकी सर्वात सुंदर पत्नी असल्याचे सांगितले जाते. त्यांनी 2004 मध्ये शेख यांच्याबरोबर लग्न केले होते.

राणी हया यांनी अद्याप दुबई सोडल्याबद्दल अधिकृत रित्या काहीही सांगितलेले नाही. मात्र त्या गेल्यानंतर शेख यांनी अधिकृत वेबसाईटवर काही शायऱ्या पोस्ट केल्या होत्या. ‘मेरी जिंदगी में अब तुम्हारी कोई जगह नहीं, मुझे परवाह नहीं कि तुम जियो या मरो।’, अशा प्रकारच्या त्या शायऱ्या होत्या. मात्र यामध्ये कोणाचाही स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला नव्हता.

हया बिंत हुसैन या शेख मोहम्मद यांच्या महालातून पळून गेलेल्या तिसऱ्या राणी आहेत. याआधी शेख मुहम्मद यांच्या दोन मुली शेखा शम्स अल मख्तूम आणि शेखा लतीफा बिंत मुहम्मद अल मख्तूम या देखील महालातून पळून गेल्या आहेत. मात्र त्यांना दुबईच्या सैनिकांनी पकडले होते. तसेच त्यांना त्यांच्या इच्छेविरूध्द दुबईमध्ये ठेवण्यात आले असल्याचे देखील सांगितले जाते.

Leave a Comment