मथुरेतील गोकर्णनाथ मंदिरातील अद्भुत मूर्ती


मथुरा ही श्रीकृष्णाची नगरी. त्यामुळे येथे श्रीकृष्णाची लहानमोठी अनेक मंदिरे असणे स्वाभाविकच. पण विशेष म्हणजे या नगरीत चारी दिशेला चार शिवालये आहेत आणि त्यामुळे येथे महादेवाला क्षेत्रपाल म्हटले जाते. या चार मंदिरातील सर्वात प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिर आहे ते गोकर्णनाथ महादेव मंदिर. हे मंदिर द्वापरयुगातील असल्याचे सांगितले जाते आणि येथे शिव महांकाळ स्वरुपात आहेत.

मथुरेच्या पूर्वेला आहे पिघलेश्वर महादेव, पश्चिमेला आहे भूतेश्वर महादेव, दक्षिणेला आहे रंगेश्वर महादेव तर उत्तरेला एका टेकडावर आहे गोकर्णनाथ महादेव. या ठिकाणाला गोकर्णेश्वर अथवा कैलास असेही म्हटले जाते. असा विश्वास आहे कि जे अपत्यहीन संततीप्राप्तीसाठी या मंदिरात १६ सोमवार पूजा व्रत करतात त्यांना संतानप्राप्ती होते. या मंदिरात सुख समृद्धी, स्वास्थ्यासाठी ४० दिवस शिवस्तोत्र आणि उसाच्या रसाने अभिषेक करण्याची प्रथा आहे. या मंदिराचा उल्लेख गीता ग्रंथात आला आहे.

या मंदिरातील मूर्ती विशेष आहे. यात शिवाने त्याचा एक हात लिंगावर ठेवला आहे तर दुसरा मनाचे स्थान मानल्या गेलेल्या हृदयावर ठेवला आहे. त्यातून असे सूचित केले गेले आहे, मानवाने काम आणि मन या दोन गोष्टींवर नियंत्रण ठेवले पाहिजे. कारण काम आणि मन हे अतिशय गतिमान असते. ही अनोखी मूर्ती पाहण्यासाठी दुरदूर ठिकाणाहून लोक येतात.

या मंदिराची कथा अशी सांगितली जाते, आत्मदेव आणि धुंदली या जोडप्याला संतान नव्हते. त्यासाठी त्यांनी प्रार्थना केली तेव्हा एका ऋषीने त्यांना एक फळ दिले आणि ते खा म्हणजे पुत्रप्राप्ती होईल असे सांगितले. पण या दोघांच्या त्यावर विश्वास बसला नाही त्यामुळे त्यांनी ते फळ गाईला खायला दिले तेव्हा तिच्या कानातून बालक जन्माला आले त्यामुळे त्याचे नाव गोकर्ण पडले. तो जन्मतःच धार्मिक होता. मात्र धुंदलीने तोपर्यंत तिच्या बहिणीचा मुलगा वंशवृद्धीसाठी दत्तक घेतला होता. तो राक्षसी प्रवृत्तीचा होता.

या मुलाने गोकर्णाच्या स्वप्नात जाऊन त्याला मला प्रेतयोनीतून मुक्त कर असे सांगितले तेव्हा गोकर्णाने सात दिवस गीता पाठ केला आणि त्याला मुक्ती मिळवून दिली. त्यानंतर गोकर्णाने यमुनेकाठी तपस्या केली तेव्हा प्रसन्न झालेल्या शिवाने त्याला कलियुगात तुझी गोकर्ण महादेव म्हणून पूजा होईल असा वर दिला.

Leave a Comment