एकवेळच्या जेवणाला मोहताज असलेली निघाली 100 कोटींची मालकीण


जयपूरमध्ये आयकर विभागाला 100 कोटींची अशी मालकीण मिळाली आहे, जीला परिवाराचे पोट भरण्यासाठी एक-एक रूपयांसाठी संघर्ष करावा लागत आहे. आयकर विभागाने जयपूर-दिल्ली हायवेवरील 100 कोटींपेक्षा जास्त किंमतीची 64 एकर जमीन शोधून काढली आहे. या जमीनीची मालकीण एक आदिवासी महिला आहे. विशेष म्हणजे या महिलेला तिने जमीन कधी खरेदी केली आणि कुठे आहे हे देखील माहित नाही. आयकर विभागाने ही जमीन आपल्या ताब्यात घेतली आहे.

जयपूर-दिल्ली हायवेवरील दंडगाव येथे येणाऱ्या या जमीनीवर आता आयकर विभागाने बॅनर लावला आहे. बॅनरवर लिहिण्यात आले आहे की, बेनामी संपत्ती निषेध अधिनियमाअंतर्गत या जमीनीला बेनामी घोषित करण्यात येत आहे. या बॅनरवर लिहिण्यात आले आहे की, या जमीनीची मालकीन संजू देवी मीणा आहे, जी या जमीनीची मालकीण होऊ शकत नाही. त्यामुळे आयकर विभाग ही जमीन आपल्या ताब्यात घेत आहे.

आयकर विभागाला तक्रार आली होती की, दिल्ली हायवेवर मोठ्या संख्येंने दिल्ली आणि मुंबईचे उद्योगपती आदिवासींच्या जमीनी हडपत आहेत. या जमीनींचे व्यवहार केवळ कागदांवर होत आहे. कायद्यानुसार, आदिवासींच्या जमीनी केवळ आदिवासीच विकत घेऊ शकतात. कागदांवर खरेदी केल्यानंतर हे लोक आपल्या लोकांच्या नावावर पावर ऑफ एटर्नीकरून ठेवतात. माहिती मिळाल्यानंतर आयकर विभागाने या जमीनीच्या खऱ्या मालकाचा शोध घेण्यास सुरूवात केली असता माहिती मिळाली की, या जमीनीची मालकीण राजस्थानच्या सिकर जिल्ह्यातील दीपावास या गावात राहते.

जमीनीची मालकीण संजू देवी मीणा यांना याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की, त्यांचे पती आणि सासरे मुंबईमध्ये काम करत होते. त्यावेळी 2006 मध्ये जयपूर येथील आमेर येथे नेऊन एका जागेवर त्यांचा आंगठा घेण्यात आला होता. मात्र त्यांच्या पतीचा 12 वर्षांपुर्वी मृत्यू झाला असल्याने त्यांना कोणती जमीन आपल्या नावावर आहे हे माहितच नाही. पतीच्या मृत्यूनंतर कोणीतरी येऊन 5 हजार रूपये खर्चासाठी देऊन जात असे, ज्यातील अडीच हजार त्यांची बहिण तर अडीच हजार त्या ठेवत असे. मला देखील आजच माझ्या नावावर ऐवढी संपत्ती आहे हे माहित पडल्याचे त्यांनी सांगितले.

संजू देवी मीणा यांच्याकडे पतीच्या मृत्यूनंतर कमाईचा कोणताच मार्ग नाही. दोन मुलांना सांभाळण्यासाठी त्या स्वतः मजूरी करतात. शेतीबरोबर प्राण्यांचा सांभाळ करत त्या स्वतःचे पोट भरतात.

Leave a Comment