आता 13 प्रादेशिक भाषांमध्ये देता येणार बँकिंगच्या परिक्षा


बँकिंगची परिक्षा देणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. आता बँकिंग परिक्षेमध्ये भाषा निवडीचे कोणतेही निर्बंध नसणार आहेत. आधी केवळ इंग्रजी आणि हिंदी भाषेमध्ये बँकिंगच्या परिक्षा देता येत होत्या. मात्र आता स्थानिक भाषांमध्ये देखील परिक्षा देता येणार आहेत. वित्त मंत्री निर्मला सीतारमण यांनी ही घोषणा केली आहे.

मागील अनेक काळापासून दक्षिणेकडील राज्यातील अनेक खासदार इंग्रजी आणि हिंदीशिवाय स्थानिक भाषेंमध्ये देखील परिक्षा आयोजित करावी याबाबतची मागणी करत होते. आज लोकसभेच्या सत्रात निर्मला सीतारमण यांनी या मागणीला स्विकृती दिली.

निर्मला सीतारमण म्हणाल्या की, स्थानिक स्तरावर देखील युवकांना रोजगाराची योग्य संधी निर्माण व्हावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) यांच्यातर्फे आयोजित रिजनस रूरल बँक्सची स्केल – 1 आणि ऑफिस असिस्टेंट परिक्षा 13 स्थानिक भाषांमध्ये होतील. यामध्ये बंगाली, गुजराती, कन्नड, कोकणी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, उडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू, उर्दू आणि आसामी या भाषांचा समावेश आहे.

काही दिवसांपुर्वी बँकेच्या परिक्षा स्थानिक भाषेत कराव्यात यासाठी ट्विटरवर देखील मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात आली होती. केवळ हिंदी आणि इंग्रजी भाषेत परिक्षा घेतल्याने स्थानिक युवकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते.

Leave a Comment