जगन्नाथ यात्रेचे विशाल रथ असे होतात तयार


जगभरात प्रसिध्द असलेली, नऊ दिवस चालणारी, पुरीची जगन्नाथ यात्रा आज म्हणजे ४ जुलै पासून सुरु होत आहे. या यात्रेसाठी देश विदेशातून लाखोंच्या संख्येने भाविक, पर्यटक आले आहेत. बुधवारी जगन्नाथ, सुभद्रा आणि बलभद्र १५ दिवसांच्या एकांतवासातून बाहेर आले आहेत आणि आता रथावर सवार होऊन ते यात्रेत सामील होणार आहेत.


रथयात्रेचा हा सोहळा शेकडो वर्षांपासून साजरा केला जातो. या यात्रेचे रथ तयार करण्याची एक परंपरा आहे आणि त्यानुसार ते तयार केले जातात. पहिला रथ असतो जगन्नाथाचा, दुसरा सुभद्रेचा तर तिसरा असतो बलभद्र किंवा बलरामाचा. ३४ भागात हे रथ बनविले जातात आणि अनेक बाबतीत ते खास असतात. या रथाबाबत पाच मुख्य गोष्टी सांगितल्या जातात.


रथ बनविण्याची सुरवात करण्यापासून ते रथयात्रा सुरु होईपर्यंत प्रत्येक कार्य मुहूर्त काढून केले जाते. या रथांसाठी जंगलातून लाकूड आणले जाते आणि ओरिसा सरकार हे लाकूड देते. रथासाठी मोठी झाडे तोडली जातात म्हणून ओरिसा सरकार १९९९ पासून दरवर्षी वनीकरण कार्यक्रम राबविते. रथांसाठी लाकडाचे लहानमोठे ४ हजार तुकडे केले जातात.


वसंतपंचमी दिवशी हे लाकूड एकत्र आणले जाते आणि रामनवमीला ते कापले जाते. रथनिर्मितीची प्रक्रिया अक्षय तृतीयेपासून सुरु होते. स्थानिक मंदिरातील २०० कारागीर रथ तयार करण्यासाठी काम करतात. अगोदर मंदिरातील पुजारी कुऱ्हाडीचा लाकडाला स्पर्श करतात. लाकडाची साग्रसंगीत पूजा केली जाते. अक्षयतृतीयेपासून या मंदिरात ४२ दिवसांचा चंदन महोत्सव साजरा होतो.


एक रथ ३४ विविध भाग जोडून बनतो. नारळाची भक्कम दोरी रथ खेचण्यासाठी तयार केली जाते. प्रत्येक रथावर ९ पार्श्वदेवता, दोन द्वारपाल, एक सारथी आणि एक ध्वजदेवता असते. या सर्व मूर्ती लाकडातून बनविल्या जातात. जगन्नाथाच्या रथाला नंदिघोष आणि कपिलध्वज, सुभद्रेच्या रथाला देवदलन आणि पद्मध्वज तर बलभद्र रथाला तालध्वज म्हटले जाते.

या तीन रथांना ४२ चाके असतात पैकी कपिलध्वजाला १६, पद्मध्वजाला १२ तर तालध्वजाला १४ चाके असतात. जगन्नाथाच्या रथासाठीचे कापड लाल हिरवे, सुभद्रेच्या रथासाठी लाल काळा तर बलभद्र रथासाठी लाल पिवळे कापड वापरले जाते. सर्वात पुढे जगन्नाथ, त्यामागे सुभद्रा आणि शेवटी बलभद्र अशी ही मिरवणूक निघते.

Leave a Comment