कंडारमातेकडे आहे प्रत्येक आजारावर उपाय


प्राचीन काळापासून भारतात अनेक रूढी, मान्यता किंवा समज रुळलेले असून आजच्या आधुनिक काळातही त्याला धक्का लागलेला नाही. काही रूढी तर जनमानसात इतक्या रुळल्या आहेत कि आजही त्याच श्रद्धेने, विश्वासाने लोक कामे करतात, नवस बोलतात. उत्तराखंडच्या उत्तरकाशी मध्ये एक मंदिर असे आहे जेथे माणसाच्या प्रत्येक आजारावर उपाय आहे. कंडारमाता मंदिराला येथील भाविक मंदिर नाही तर न्यायालय, दवाखाना आणि ज्योतिष कार्यालय मानतात. या मंदिराचे वैशिष्ट असे कि कोणतेही आवश्यक निर्णय या मातेची डोली किंवा पालखी देते.


या परिसरात भाविक जमा होतात आणि पालखी खांद्यावर घेऊन कंडारमातेचे मन:पूर्वक स्मरण करतात. पालखी हलते आणि पालखीचा पुढचा भाग जमिनीला टेकतो. त्यामुळे जमिनीवर काही रेषा उमटतात. त्या रेषांवरून तिथी, वेळ, जन्मकुंडली मांडली जाते. आजारावर उपचार घेण्यासाठी भाविक येथे येतात देवीची मनापासून प्रार्थना करतात आणि काही दिवसात रोगमुक्त होतात. पुजारी सांगतात येथे पंचांग, औषध किंवा कोतवालाचा दंडा कामाचा नाही कारण येथे कंडार मातेचा आदेश सर्वमान्य आहे.


हे मंदिर प्राचीन आहे आणि ते केवळ भक्तांचे श्रद्धास्थान नाही तर न्यायालय आहे. येथे निर्णय कागदावर दिला जात नाही तसेच बाजू मांडण्यासाठी वकील लागत नाही. देवीची पालखी निर्णय देते. लग्न व अन्य कोणत्याही शुभकार्याचा मुहूर्त पालखीने जमिनीवर उमटलेल्या रेषा पाहून काढले जातात. डोकेदुखी, दातदुखीचा त्रास होणाऱ्यांना येथे दर्शन घेतले कि दुखण्यापासून त्वरित आराम मिळतो. उत्तरकाशी पासून साधारण अर्धा किलोमीटर अंतरावर हे भव्य मंदिर आहे.

Leave a Comment