नेपाळ मध्ये चौधरी ग्रुप घडविणार इंटरनेट क्रांती


हुवावेच्या ५ जी नेटवर्क साठी भारताने चाचण्या घेण्याची परवानगी देऊ नये यासाठी अमेरिकेकडून दबाव आणला गेला असतानाच शेजारी नेपाळ मध्ये रिलायंस जिओचा आदर्श ठेऊन नेपाळचे मुकेश अंबानी म्हटले जाणारे विनोद चौधरी इंटरनेट क्रांती घडविण्यासाठी सज्ज झाले आहेत. अमेरिकेच्या दबावाला भिक न घालता चौधरी ग्रुपने चीनी हुवावे कंपनीबरोबर ४ जी नेटवर्क साठी सहकार्य करार केला आहे. त्यासाठी कंपनीने १० कोटी डॉलर्सच्या गुंतवणूक करारावर सह्या केल्या आहेत.


रॉयटरने दिलेल्या बातमीनुसार चौधरी ग्रुपचे प्रमुख विनोद चौधरी एका मुलाखतीत म्हणाले, रिलायंस जिओने जे भारतात केले तेच आम्हाला नेपाळमध्ये करायचे आहे. चौधरी ग्रुपने फोर जी नेटवर्क साठी सुरवातीला २५० दशलक्ष डॉलर्स ची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला असून त्यात मोफत व्हॉइस कॉल, डेटा, ऑनलाईन पेमेंट सुविधा व अन्य सेवांवर अधिक लक्ष दिले जाणार आहे.


चौधरी कुटुंब मुळचे भारतातील राजस्थानचे. त्यांचे वाडवडील व्यवसायासाठी कित्येक वर्षापूर्वी नेपाळला गेले आणि तेथेच राहिले. सुरवातीला कपडे व्यवसायात उतरलेल्या चौधरीनी नेपाळ मध्ये पहिले डिपार्टमेंटल स्टोर सुरु केले. विनोद यांच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा ते अवघे १८ वर्षाचे होते. पण त्यांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळली. शिक्षण अर्धवट सोडून व्यवसाय सुरु केला. प्रथम भारतात आणि नंतर संपूर्ण आशिया मध्ये त्यांच्या वाय वाय नुडल्स ना कमालीची लोकप्रियता मिळाली आहे.

आज चौधरी ग्रुप नेपाळ मधले एकमेव अब्जाधीश कुटुंब असून नुडल्स बरोबरच त्यांचा हॉटेल, रेसोर्ट, बँक व्यवसाय आहे. त्यांची ताज हॉटेल्समध्ये भागीदारी आहे तसेच मालदीव येथे दोन रिसोर्ट व अन्य ठिकाणी अनेक रिसोर्ट आहेत. विमा, फूड, रिअल इस्टेट या बरोबरच ते इलेक्ट्रोनिक आणि टेलिकॉम व्यवसायात सक्रीय आहेत. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार चौधरी ग्रुप ची संपत्ती ८९७ कोटी डॉलर्स असून भारत, सर्बिया, बांगलादेश मध्ये त्यांचे नुडल्स कारखाने आहेत. या ग्रुप मध्ये १८ हजार कर्मचारी काम करतात. मद्य निर्यात परवाना मिळविण्यासाठी त्यांनी १९७० मध्ये नेपाळमध्ये पहिला नाईट क्लब सुरु केला आणि मद्य निर्यातीचा परवाना मिळविला होता.

Leave a Comment