26 वर्षांपासून हा मुस्लिम व्यक्ती करत आहे हिंदू मंदिराची सेवा


हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या अनेक गोष्टी आपण अनेकदा ऐकत असतो. असेच एक उदाहरण उत्तरप्रदेशमधील मुज्जफरनगर येथे पाहायला मिळाले आहे. मुज्जफरनगरमधील मुसलमान गेली 26 वर्षांपासून एका मंदिराची काळजी घेत आहेत. शहरातील लड्डेवालाकडे जाणाऱ्या रोडपासून एक किलोमीटर अंतरावर दोन इमारतींच्या मध्यभागी हे मंदिर आहे. अयोध्यामध्ये बाबरी मस्जिद पाडल्याच्या घटनेनंतर येथे राहणारे हिंदू कुटूंब ते सोडून गेले होते.

येथे राहणारे स्थानिक मुसलमान रोज या मंदिराची साफ-सफाई करत असतात. दरवर्षी दिवाळीच्या मुहर्तावर मंदिराला रंग दिला जातो. त्याच बरोबर मोकाट प्राणी तसेच, अवैध कब्जा करणाऱ्या लोकांपासून देखील या मंदिराला त्यांनी वाचवले आहे. मुस्लिम बहुल लड्डेवाला येथे राहणारे 60 वर्षीय मेहरबान अली आजही त्या दिवसांची आठवण काढतात, जेव्हा तेथे राहणारे हिंदू कुटूंब सांप्रदायिक संघर्षानंतर तेथून निघून गेले होते.

मेहरबान सांगतात की, ‘जितेंद्र कुमार हे माझ्या सर्वात जवळच्या मित्रांपैकी एक होते. ते या जागेला सोडून निघून गेले. सांप्रदायिक संघर्षानंतर देखील मी त्याला थांबवण्याचा खुप प्रयत्न केला. मात्र अन्य परिवारांबरोबर परत येण्याचे त्यांनी वचन दिले होते. पण अद्याप ते आले नाहीत. तेव्हापासून, येथील स्थानिक लोकच मंदिराची काळजी घेत आहेत.’

या भागात जवळपास 35 मुस्लिम परिवार राहतात. त्यापैकी अनेकांना आजही वाटते की, त्यांचे हिंदू शेजारी परत येतील. स्थानिक लोकांनुसार 1990 च्या काळात तेथे जवळपास 20 हिंदू परिवार राहत होते तर मंदिर जवळपास 1970 च्या काळात बनवण्यात आलेले आहे.

Leave a Comment