मुंबईच्या महापौरांना मनसेकडून जाड भिंगाचा चष्मा सप्रेम भेट


मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईत पाणी तुंबले नसल्याचे म्हणणाऱ्या मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची खिल्ली उडवली. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना जाड भिंगाचा चष्मा माजी नगरसेवक आणि पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी पाठवला. महापौरांनी काल मुंबईत पावसाचे पाणी तुंबले नसल्याचे वक्तव्य केले होते. मनसेने त्यावरुन महापौरांवर टीकास्त्र सोडले.

संदीप देशपांडे म्हणाले, मुंबईत तुंबलेले पाणी, लोकांना झालेला त्रास मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर साहेब यांना दिसलाच नाही. ते स्वत: म्हणाले शिक्षक आहेत त्यामुळे खोटे बोलत नाही. आम्हाला त्यामुळे असे वाटते की त्यांना दिसण्याचा प्रॉब्लेम असावा. म्हणून हा जाड भिंगाचा चष्मा खास महापौरांसाठी आणला आहे. महापौरांना या चष्म्यातून तरी दिसावे, अशी आमची अपेक्षा आहे. आम्ही हा चष्मा महापौरांना कुरिअरने पाठवत आहोत. मुंबईची दुरावस्था ज्या नेत्यांना दिसत नाही, त्या सर्वांसाठी मोफत चष्मा पाठवण्याचे काम मनसे करेल.

Leave a Comment