5 वेळा विम्बल्डन विजेत्या वीनस विल्यम्सचा 15 वर्षीय खेळाडूने केला पराभव


यंदाच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील पहिल्याच राऊंडमध्ये एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. टेनिस स्टार वीनस विल्यम्सला युवा खेळाडू कोरी गॉफकडून पराभव स्विकारावा लागला आहे. 15 वर्षीय कोरी गॉफने 5 वेळाची विम्बल्डन विजेती  वीनस विल्यम्सचा सरळ सेटमध्ये 6-4, 6-4 असा पराभव केला. टेनिस जगतातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा उलटफेर समजला जात आहे.

15 वर्षीय युवा खेळाडू कोरी गॉफ ही वीनस विलेयम्सला आपला आदर्श मानते. आज तिने तिचाच पराभव करत इतिहास रचला आहे. हा सामना विम्बल्डनच्या ऑल इंग्लंड क्लब येथे खेळला गेला. आपल्या विजयानंतर कोरी गॉफ म्हणाली की, ‘मी नशीबवान आहे की, विम्बल्डनने मला वाईल्ड कार्ड एंट्री देत खेळण्याची संधी दिली. मला विश्वास नव्हता की, मी असे करू शकेल. मला महान खेळाडू बनायचे आहे, हे मी आधीही सांगितले आहे.’

गॉफ ही ओपन एरा विम्बल्डनमध्ये क्वालीफाई करणारी सर्वात तरूण खेळाडू आहे. 13 मार्च 2003 रोजी फ्लोरिडा येथे जन्म झालेल्या कोरी गॉफने आपल्या पेक्षा 24 वर्षांनी मोठी असलेल्या 39 वर्षीय वीनस विलियम्सचा पराभव करत इतिहास रचला आहे. दुसऱ्या फेरीत आता गॉफचा सामना माग्दलेना राइबारिकोवा हिच्याबरोबर होणार आहे.

Leave a Comment