टाळेवाली माता मंदिराची अद्भुत कहाणी


आयुष्यात खूप मेहनत केली पण हवे तसे यश मिळत नाही ही अनेकांची समस्या आहे. अश्यावेळी आपल्याकडे त्याच्या नशिबाला टाळे लागलेय म्हणजे कुलूप लागलेय असे म्हटले जाते. तुमच्याही नशिबाला असे टाळे लागले असेल तर ते खोलायाचा मार्ग म्हणजे नशीब उघडण्याचा एका मार्ग आहे. त्यासाठी कानपूर मधल्या बंगाली टोला भागातील कालीमाता मंदिरात जावे लागेल. या कालीमातेला टाळेवाली माता असेही म्हटले जाते. कारण येथे नशिबाला टाळे लागलेले त्रस्त भाविक चक्क कुलूप वाहतात आणि किल्ली बरोबर नेतात. त्यांची इच्छापूर्ती झाली कि परत येऊन कुलूप उघडतात.


हे मंदिर ३०० वर्षे जुने असल्याचे सांगतात. नवरात्रीत येथे प्रचंड गर्दी होते. असे मानले जाते कि मनापासून जे भाविक माताराणीच्या चरणावर त्यांची इच्छा बोलून कुलूप वाहतात ती अवश्य पूर्ण होते. बहुतेक भाविक लोखंडी कुलुपे वाहतात तर काही सोने, चांदी वा अन्य धातूची कुलुपे सुद्धा वाहतात. अर्थात कुलूप वाहण्याअगोदर कुलुपाचे पूर्ण विधी विधान केले जाते. त्याची पूजा केली जाते. अनेक वर्षे ही परंपरा सुरु आहे.

या मंदिराची अशी कथा सांगतात कि शेकडो वर्षापूर्वी एक महिला खूप अडचणीत होती. ती रोज कालीमातेच्या दर्शनाला येत असे. काही दिवसांनी ती मंदिराच्या प्रांगणात कुलूप लावताना दिसली तेव्हा पुजारी बुवांनी कुलूप का लावले असे विचारले. तेव्हा तिने स्वप्नात कालीमाता आली आणि तिनेच हे करायला सांगितले असे उत्तर दिले. यामुळे इच्छा पूर्ण होईल असेही सांगितले. काही दिवसांनी भिंतीवर या महिलेला तुझी इच्छा पूर्ण झाली आहे असा संदेश लिहिलेला दिसला आणि तेव्हापासून ती महिला परत कधी दिसली नाही. मात्र तेव्हापासून कालीमातेच्या चरणावर कुलूप वाहायची प्रथा सुरु झाली असे समजते. यामुळे या कालीमातेचे नाव तालेवाली माता असे पडले.

Leave a Comment