मध्यप्रदेशात सिंहस्थ आणि मुख्यमंत्री यांच्यातील अजब योग


मध्यप्रदेशात सध्या सिंहस्थ पर्वणीची जोरदार चर्चा सुरु झाली आहे ती एका अजब योगायोगामुळे. २०१८च्या विधानसभा निवडणुकीत सत्तेवरून पायउतार व्हावे लागलेले मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी हा अजब योगायोग नजरेस आणून दिला आहे. विधानसभेत पत्कराव्या लागलेल्या पराभवाविषयी बोलताना शिवराजसिंग यांनी पत्रकारांना सांगितले कि, मध्यप्रदेशात सिंहस्थ झाला कि मुख्यमंत्री बदलतो. मध्यप्रदेश स्वतंत्र राज्य म्हणून १९५६ ला अस्तित्वात आल्यावर पाच सिंहस्थ झाले आहेत आणि प्रत्येकवेळी त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना सत्ता गमवावी लागली आहे. याला खुद्द शिवराजसिंग साक्षीदार आहेत.

दर १२ वर्षांनी जेव्हा गुरु ग्रह सिंह राशीत प्रवेश करतो तेव्हा सिंहस्थ पर्वणी साजरी होते. यावेळी भाविक क्षिप्रा नदीत स्नान करतात. महाकाळ नगरी उज्जैन येथे ही पर्वणी कुंभ म्हणून साजरी केली जाते. या सिंहस्थ पर्वणीचा इतिहास मोठा आहे.


१९५६ मध्ये मध्यप्रदेश राज्य बनल्यावर प्रथम सिंहस्थ पर्वणी आली. तत्कालीन मुख्यमंत्री रविशंकर शुक्ल यांनी त्याचे आयोजन केले आणि ३१ डिसेम्बरला त्यांचे मुख्यमंत्रीपद गेले. १९६८ ला सिंहस्थ कुंभ होता. त्यावेळी गोविंद नारायण सिंग मुख्यमंत्री होते. त्यांनी सिंहस्थ कुंभ मेळ्याचे आयोजन केले आणि त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. मार्च एप्रिल १९८० मध्ये जनता दलाचे सरकार आले आणि सुंदरलाल पटवा मुख्यमंत्री झाले. पण सिंहस्थ पर्वणी नंतर एक महिन्याच्या आत त्यांचे मुख्यमंत्रीपद गेले.

१९९२ च्या सिंहस्थवेळी बाबरी मशीद पडली होती. तेव्हाही सुंदरलाल हेच मुख्यमंत्री होते. तेव्हा जेथे बीजेपीचे शासन होते त्या सर्व राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली गेली होती. ३ डिसेंबर १९९३ पर्यंत राष्ट्रपती राजवट होती तेव्हा कॉंग्रेसचे दिग्विजय सिंग मुख्यमंत्री होते. एप्रिल २००४ मध्ये येणाऱ्या सिंहस्थाची तयारी दिग्विजय यांनी २००३ मध्ये सुरु केली आणि ते विधानसभा निवडणूक हरले. तेव्हा भाजप सत्तेत आले आणि उमा भारती मुख्यमंत्री बनल्या. २००४ चे सिंहस्थ झाले आणि उमा भारती मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्या कारण १९९४ साली झालेल्या हुबळी दंग्यासाठी कर्नाटक कोर्टाने उमाभारती यांना अटक करण्याचे वॉरंट काढले त्यामुळे त्यांनी २३ ऑगस्ट २००४ ला राजीनामा दिला.

शिवराजसिंग हे दीर्घकाळ मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री होते. २०१६ मध्ये सिंहस्थ पर्वणी आली. त्याची जोरदार तयारी शिवराज यांनी केली. ५ हजार कोटी खर्च केले. या मेळ्याला नरेंद्र मोदी उपस्थित होते मात्र २०१८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले नाही आणि शिवराजसिंग यांचे मुख्यमंत्रीपद हुकले.

Leave a Comment