जगातील सर्वात मोठ्या विमानातून सर्वात छोटा प्रवास


जगातील सर्वात मोठी विमाने म्हणून एअरबस ए ३८० विमाने ओळखली जातात. या विमानातून एकदा तरी प्रवास घडावा अशी अनेकांची इच्छा असते. या विमानातून जगातील सर्वात कमी अंतराचा प्रवास करण्याचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरले आहे ते अमिराती एअरलाईन कंपनीमुळे. या कंपनीने बलाढ्य एअरबस ए ३८० विमानातून जगातील सर्वात कमी अंतराचा म्हणजे ३४० किमी अंतराचा प्रवास करण्याची सुविधा दिली आहे. दुबई ते मस्कत असा ४० मिनिटांचा हा प्रवास आहे.

अमिराती एअरलाईन्सने ट्विटरवर मोठे विमान, छोटा प्रवास असे या संदर्भात लिहिले आहे. एअरलाईन्सचे डिव्हिजनल वरिष्ठ उपाध्यक्ष शेख मजीद अल मौला म्हणाले या रुटवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूप जास्ती आहे. त्यांना मोठ्या विमानातून प्रवासाचा नवा अनुभव मिळावा अशी आमची इच्छा आहे. ओमान हे आमचे प्रमुख डेस्टिनेशन असून प्रवासी वेळेवर पोहोचण्यासाठी चांगल्या सुविधा देणे हे आमचे ध्येय आहे. छोट्या प्रवासाचे पूर्वीचे रेकॉर्ड आमच्याच नावावर होते ते आम्हीच तोडले आहे.


यापूर्वी दुबई दोहा अशी फ्लाईट २०१७ मध्ये आम्ही सुरु केली होती मात्र कतार आणि दुबई या दोन देशातील संबंध ताणले गेल्याने ती बंद केली. एअरबसचे सर्वात मोठे उड्डाण दुबई ओकलंड नॉनस्टॉप याच कंपनीने सर्वप्रथम सुरु केले ते मार्च २०१६ मध्ये. यापूर्वी याच प्रवासात बोईंग ७७७, २२ सीआर विमान वापरले जात होते.

एअरबस ए ३८० मध्ये एकावेळी ८५३ प्रवासी प्रवास करू शकतात असे सांगितले जाते. सुरवातीला अशी फक्त १६० विमाने तयार केली गेली होती मात्र आता त्यांची मागणी वाढत आहे. भारतापुरते बोलायचे तर २०१४ मध्ये भारत सरकारने या विमानावर बंदी घातली होती. कारण यामुळे भारतीय विमान कंपन्यांना नुकसान सोसावे लागेल असे मानले जात होते. प्रवासी ही विमाने असलेल्या परदेशी कंपन्यांना अधिक पसंती देतील ही भीती होती. आता मात्र भारत सरकारने ही बंदी मागे घेतली आहे.

या विमानाचे वजन ५६० टन असून त्याची उंची सात मजली इमारतीइतकी आहे. त्याचे इंटिरियर पंचतारांकित हॉटेल प्रमाणे असून त्यात लॉबी, रेस्टरूम आहे. हे विमान विनाथांबा १५७०० किमीचा प्रवास करू शकते आणि त्याचे भाडे ३० हजार पासून दोन लाख रुपयांपर्यंत आकारले जाते.

Leave a Comment