गेट वे ऑफ इंडिया संबंधी काही मनोरंजक माहिती


मुंबईमध्ये सध्या संततधार पाउस बरसतो आहे पण सच्च्या मुंबईकरासाठी पाउस नवी पर्वणी घेऊन येतो. मरीन ड्राईव्ह वर उसळणाऱ्या तुफानी लाटा मुंबईला अक्षरशः वेड लावतात आणि पावसाने तुंबापुरी झालेल्या या नगरीतील नगरवासी समुद्र जेथे म्हणून उफाणाला येतो तेथे धाव घेतात. अगदी मुलाबाळांसह. मुंबईची शान, देशाचा महत्वाचा लँडमार्क आणि भारताच्या इतिहासाचा एक भाग असलेले द. कुलाबा मधील गेट वे ऑफ इंडिया याला अपवाद नाही. या गेटवे विषयी काही मनोरंजक माहिती जाणून घेणे सर्वाना आवडावे.

मुंबई भेटीवर येणारा कुणीही देशवासी असो अथवा परदेशी पर्यटक असो गेट वे ऑफ इंडिया पाहिल्याशिवाय त्याचे मुंबई दर्शन पूर्ण होत नाही अशी ही वास्तू. ती उभारली त्यावेळच्या भारत सरकारने. ब्रिटीश शासन काळात १९११ मध्ये या जागेची पायाभरणी केली गेली ती मुख्यत्वे पंचम जॉर्ज आणि त्याची राणी मेरी भारत भेटीवर येणार त्यांचे स्वागत करण्यासाठी आणि त्यांची आठवण म्हणून. १९१४ साली या गेटच्या डिझाईनला भारत सरकारने मान्यता दिली. १९२० साली हे काम पूर्ण झाले आणि ४ डिसेम्बर १९२४ ला त्याचे उद्घाटन केले गेले. जॉर्ज विटेट यांनी या गेटचे डिझाईन बनविले होते.


गेट वे ऑफ इंडिया म्हणजे भारताचे प्रवेशद्वार. या गेटच्या बांधकामासाठी त्यावेळी २१ लाख रुपये खर्च आला होता. त्यातील बहुतेक खर्च तत्कालीन भारत सरकारनेच केला होता पण अनुदान न मिळाल्याने या गेटला जोडणारा अप्रोच रोड कधीच बांधला गेला नाही. रस्त्याच्या एका अँगलवर असलेली ही वास्तू इंडो सेरासिनिक शैलीमध्ये बांधली गेली आहे. १६ व्या शतकातील मुस्लीम बांधकाम शैलीचाही त्यावर ठसा आहे. गेटच्या मधला घुमट १५ मीटर म्हणजे साधारण ४८ फुटी असून त्याची जमिनीपासूनची उंची आहे २६ मीटर म्हणजे साधारण ८ फुट. याला चार गेट आहेत. याचे उद्घाटन तत्कालीन व्हॉइसरॉय अर्ल ऑफ रीडिंग यांनी केले होते.

या गेटचा उद्देश पंचम जॉर्ज आणि मेरी याचे स्वागत हा होता पण विशेष म्हणजे याच गेटमधून ब्रिटीशांची पहिली बटालियन ऑफ सॉमरसेट लाईट इन्फंट्री भारताला स्वतंत्र मिळाल्यावर रिट्रीट सेरेमनीमध्ये येथूनच भारताबाहेर पडली. २८ फेब्रुवारीला शेवटची ब्रिटीश नौका इंग्लंडला याच गेटपासून गेली. गेटवेच्या समुद्राकडील बाजूला पायऱ्या आहेत आणि तेथून घारापुरी लेणी साठी बोटी सुटतात. गेटवे समोर शिवाजीराजे आणि विवेकानंद यांचे पुतळे नंतर उभारले गेले. याच्या एका बाजूला प्रसिद्ध ताजमहाल हॉटेल आहे.

Leave a Comment