राहुल गांधीची मनधरणी करणार काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री


नवी दिल्ली – आज सोमवारी राहुल गांधीची काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री भेट घेणार आहेत. राहुल गांधी यांना या नेत्यांकडून राजीनामा मागे घेण्याची विनंती करण्यात येणार आहे. यापुर्वी राहुल यांना काँग्रेसच्या लोकसभेतील 51 खासदारांनी राजीनामा मागे घेण्याची विनंती केली होती. पण अध्यक्षपदी राहण्यास राहुल यांनी नकार दिला होता.

आज राहुल गांधी आणि काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री यांची भेट होणार आहे. आज होणाऱ्या बैठकीत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग , छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि पुडुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी हे उपस्थित असणार आहेत. पक्षातील महासचिव, प्रदेशाध्यक्ष किंवा मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राजीनामा देण्याचे धाडस दाखवले नाही. हे सर्व दुख:द असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटल्यानंतर अनेक राज्यांच्या नेत्यांनी राजीनामा दिला होता.

शीला दिक्षित यांनी दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटीने दिल्लीतील सर्व २८० ब्लॉक कमिटींना बर्खास्त केल्याची माहिती दिली आहे. तर, तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनेक नेत्यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेस सचिव वीरेंद्र राठोड, अनिल चौधरी, राजेश धर्मानी आणि वीरेंद्र वशिष्ट यांनी राजीनामा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १२० जणांनी सही करत राजीनामा सोपवला आहे. यामध्ये, सचिव, युथ काँग्रेस, महिला काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

काँग्रेसच्या कार्यकारणीची लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर बैठक झाली होती. त्यामध्ये राहुल गांधींनी अध्यक्षपद सोडणार असल्याचे म्हटले होते. त्यावर तुम्हाला पर्याय असू शकत नसल्याचे मत व्यक्त करत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी राहुल यांचा राजीनामा फेटाळून लावला होता.

Leave a Comment