आता प्रवासी लाईव्ह पाहू शकणार रेल्वेत तयार होणारे जेवण !


नवी दिल्ली : सध्याच्या घडीला भारतीय रेल्वे प्रवाशांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अनेक सुखसुविधा देण्याचा नेहमीच प्रयत्न करते. त्यातच एक महत्वाची सुविधा म्हणजे रेल्वेत मिळणारे जेवण. लांबच्या पल्ल्याच्या प्रवासा दरम्यान प्रवाशांना खानपानाचा कोणताही त्रास होऊ नये म्हणून यासाठी रेल्वेने गाडीतच प्रवाशांना जेवण उपलब्ध करुन दिले. पण आपण अनेकवेळा रेल्वेत मिळणाऱ्या जेवणाच्या दर्जाबाबत अनेक तक्रारी झाल्याचे ऐकले आहे. आता त्याच तक्रारी दूर करण्यासाठी रेल्वेने एक नवा उपक्रम सुरु केला आहे.

शनिवारी पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी एक आढावा बैठक घेतली. जेवणासंबंधीत अनेक मुद्यांवर या बैठकीत चर्चा झाली. तसेच, लवकरात लवकर या तक्रारी कशा सोडवता येतील यावर विचार करण्यात आला. अनेक प्रिमिअम गाड्यांसाठी जेवण आयआरसीटीसी द्वारे चालवण्यात येणाऱ्या बेस किचनमध्ये तयार केले जाते. या बेस किचनमधून लाईव्ह फीड देण्यासाठीची व्यवस्था लवकरात लवकर करण्याचे आदेश पीयूष गोयल यांनी दिले आहेत. प्रवासी या लाईव्ह फीडद्वारे त्यांचे जेवण कसे बनवले जात आहे आणि त्यासाठी हवी ती काळजी घेतली जात आहे की नाही, हे पाहू शकणार आहेत.

त्याचबरोबर बेस किचनमधून पॅक होणाऱ्या जेवणावर क्यूआर कोड लावण्याच्या विचारात रेल्वे प्रशासन आहे. प्रवाशांच्या जेवणासंबंधी सर्व माहिती या क्यूआर कोडच्या आधारे मिळेल. जसे जेवण कुठल्या बेस किचनमध्ये तयार झाले, किती वाजता पॅक करण्यात आले इत्यादी सर्व माहिती या क्यूआर कोडमुळे मिळेल. या क्यूआर कोडमुळे प्रवाशांना जेवणाची मूळ किंमतही कळेल. त्यामुळे ही प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल.

‘नो-बिल, नो-पेमेंट’ वरही रेल्वे मंत्र्यांनी घेतलेल्या या आढावा बैठकीत चर्चा झाली. मुंबईत ही योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेला आता अन्य गाड्यांमध्येही लागू करण्यावर विचार सुरु आहे. लवकरच ‘नो-बिल, नो-पेमेंट बाबतचे निर्देश मेटल शीटवर प्रिंट करुन गाड्यांमध्ये लावले जाईल. या शीटवर बिल न दिल्यास टीसीद्वारे करण्यात येणाऱ्या कारवाईबाबतही माहिती देण्यात येईल, असे पीयूष गोयल यांनी बैठकीत म्हटले.

Leave a Comment