मोबाईल-सोशल मीडिया सुखी संसारात कालवत आहे विष


मुंबई : सध्याच्या घडीला अनेक घरोघरी दोघात तिसरा आणि सुखी संसार विसरा असे चित्र दिसत आहे. हा दुसरा-तिसरा कुणी नसून, तुमच्या हातात असलेला मोबाईल असूव पती-पत्नी घरी एकमेकांना कमी आणि मोबाईलवर, सोशल मीडियाला जास्त वेळ देत असल्याचे दिसून आले आहे. मोबाईल-सोशल मीडियामुळे 30 टक्के घरगुती भांडणे होत असल्याचे वास्तव, नागपूर पोलिसांच्या ‘भरोसा सेल’ने समोर आणले आहे. घटस्फोटाचे प्रमाण सोशल मीडियाच्या अतिवापराने वाढले असून मोबाईल-सोशल मीडिया 30 टक्के संसारात विष कालवत आहेत.

घरात पती-पत्नीचा सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. सुखी संसारात व्हिलन ठरलेल्या सोशल मीडियाचे हे वास्तव असून नागपूरसारख्या मोठ्या शहरातील बरेच पती-पत्नी नोकरी करतात. ते सायंकाळी घरी परतल्यानंतर एक-दुसऱ्यांना देण्याचा वेळ, बरेच पती-पत्नी मोबाईलवर फेसबूक, व्हॉटसअपला जास्त देतात. घरगुती वादाची ठिणगी यातूनच पेटते. दरवर्षी सव्वादोन हजाराच्या आसपास घरुगुती भांडणाचे खटले नागपूर पोलिसांच्या भरोसा सेलकडे येतात. त्यापैकी 30 टक्के कुटुंबाच्या सुखी संसारात मोबाईल आणि सोशल मीडियाच व्हिलन असल्याचे दिसून येत असल्याची माहिती, भरोसा सेलच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभदा संख्ये यांनी दिली.

घरगुती वाद सोडवण्यासाठी नागपूर पोलीसांनी भरोसा सेलची सुरुवात केली आहे. वर्षाला अनेक तक्रारी या भरोसा सेलमध्ये येत आहेत. यापैकी 30 टक्के कुटुंबात मोबाईल आणि सोशल मीडिया विष कालवत असल्याचे वास्तव आहे. सोशल मीडिया दुधारी शस्र आहे, सकारात्मक कामांसाठीही त्याचा वापर होतो, तर कौटुंबिक सख्य अतिवापर बिघडवते, असे सोशल मीडिया विश्लेषक अजित पारसे सांगतात. यापूर्वी घटस्फोटासाठी न्यायालयात हुंडा, घरगुती हिंसाचार, दारुडा पती, व्यभीचार, विवाहबाह्य संबंध, नपुंसकता, अशी कारणे दिली जात होती. पण या हायटेक युगात आता मोबाईल आणि सोशल मीडियाचा अतिवापरही घटस्फोटाचे कारण ठरत आहे.

Leave a Comment