सुरक्षा प्रशिक्षण घेऊन प्रिन्स विलियम, केट पाकिस्तान दौरा करणार


ब्रिटीश राजघराण्याचा वारसदार प्रिन्स विलियम आणि त्याची पत्नी केट मिडलटन त्यांच्या पहिल्या अधिकृत पाकिस्तान दौऱ्याची तयारी करत असल्याचे केंसिग्टन पॅलेस तर्फे रविवारी ट्विटरवरून जाहीर करण्यात आले आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात कधीतरी हा दौरा होणार आहे. ब्रिटीश मिडीयाने दिलेल्या वृत्तानुसार ड्युक व डचेस ऑफ केम्ब्रिज फॉरीन अँड कॉमनवेल्थ ऑफिसच्या विनंतीवरून हा दौरा करणार आहेत. १३ वर्षानंतर प्रथम शाही कुटुंबातील सदस्य पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानात दहशदवादी उपद्रव लक्षात घेऊन सुरक्षेच्या दृष्टीने प्रिन्स विलियम आणि केट त्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ते प्रशिक्षण घेणार असून हा कालावधी १ आठवड्याचा असेल. या दौऱ्यात ते इस्लामाबाद, लाहोर, क्वेटा, कराची व पेशावर या शहरांना भेट देतील तसेच ग्रामीण समुदायाशी संवाद साधतील. या दौऱ्यात या जोडप्याची तिन्ही मुले, प्रिन्स जॉर्ज, प्रिन्सेस शार्लट आणि प्रिन्स लुईस सामील होणार नाहीत असे समजते.

पाकिस्तानने प्रिन्स विलियमच्या पाक भेटीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ब्रिटनमधील पाकिस्तानचे उच्चायुक्त नफीस झकारिया म्हणाले, या दौऱ्यातून ब्रिटन पाकिस्तानला किती महत्व देते हे दिसून आले आहे. या दोन्ही देशांचे इतिहासिक संबंध असून ते अधिक दृढ व्हावेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या पूर्वी २००६ मध्ये प्रिन्स चार्ल्स आणि त्यांची पत्नी कॅमिला यांनी पाकिस्तानला भेट दिली होती. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी १९६१ व १९९७ असा दोन वेळा पाक दौरा केला आहे. तर प्रिन्स विलियम यांची आई डचेस डायना हिने अनेकदा पाकिस्तानला भेट दिली होती. १९९१ मध्ये ती एकटीच पाक दौर्यावर गेली होती. चॅरिटी वर्कसाठी ती तेथे गेली होती.

दरवर्षी सरासरी २,७००० ब्रिटीश नागरिक पाकिस्तानला जातात आणि ब्रिटन मध्ये पाकवंशीय अनेक नागरिक स्थलांतरित झालेले आहेत. ब्रिटीश एअरवेज ने १० वर्षांच्या खंडानंतर नुकतीच पाकिस्तानसाठी पुन्हा सेवा सुरु केली आहे.

Leave a Comment