या मंदिरात भोलेनाथाच्या अगोदर होते रावणाची पूजा


भोलेनाथ, महादेव, शंकर, शिव, नीलकंठ, अश्या अनेक नावानी भारतात देवांचा देव महादेव याला पूजले जाते आणि देशात लाखोनी असलेल्या शिवालयाच्या काही खास परंपरा येथे आवर्जून पाळल्या जातात. भोलेनाथाचे अनेक परमभक्त आहेत. लंकेचा राजा रावण हा सुद्धा परम शिवभक्त होता. त्यामुळे भारतात एक शिवमंदिर असेही आहे, जेथे भोलेनाथाच्या अगोदर रावणाची पूजा केली जाते. हे मंदिर राजस्थानच्या उदयपुर शहराजवळ असून झाडोल तहसील मध्ये आवारगढ येथे पहाडात आहे. याला कमलनाथ महदेव मंदिर असे म्हटले जाते.

या मंदिरात शिवलिंगाची स्थापना रावणाने केली असे सांगतात. येथे रावणाने त्याचे मस्तक कापून अग्निकुंडात टाकले होते अशी आख्यायिका आहे. या मंदिराची कहाणी अशी कि, रावणाने कैलासावर शिव प्रसन्न व्हावे म्हणून घोर तप केले होते. शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी रावणाला वर माग असे सांगताच रावणाने तुम्ही लंकेत चला असा आग्रह धरला. तेव्हा शिवाने त्याला आत्मलिंग दिले आणि लंकेत हे घेऊन जा मात्र रस्त्यात मध्ये कुठेही ठेऊ नको अशी आज्ञा दिली.


रावण लिंग घेऊन निघाला मात्र रस्त्यात तो दमला आणि विश्रांतीसाठी थांबला तेव्हा त्याने हे लिंग जमिनीवर ठेवले. हे लिंग येथेच रुतून बसले आणि ते रावणाला बाहेर काढता येईना तेव्हा त्याने पुन्हा घोर तप सुरु केले. शिवलिंगाची पूजा करताना रोज लंकेतून येऊन १०० कमळे शंकराला अर्पण करण्याचा त्याने नेम केला आणि तो रोज १०० कमळे वाहून शिवपूजा करू लागला. त्याची पूजा सफल होणार असे दिसताच ब्रह्मदेवाने पूजेच्या फुलातील एक कमळ अदृश्य करून टाकले. एक फुल कमी आहे हे लक्षात येताच रावणाने त्याचे मस्तक कापून शिवाला अर्पण केले.

या भक्तीने प्रसन्न झालेल्या शिवाने रावणाच्या नाभीमध्ये अमृतकुंड ठेवले. त्यातून रावणाला जीवन शक्ती मिळत असे. त्यामुळेच रावण वध करताना रावांच्या नाभीत बाण मारून त्याला रामाने ठार केले होते. कमलनाथ महादेव मंदिरात शिवपूजेअगोदर रावणाची पूजा करण्याची प्रथा आहे आणि ही प्रथा पाळली नाही तर शिवाची पूजा संपन्न होत नाही असे सांगितले जाते. हे मंदिर पहाडावर असून दोन किमीचा रस्ता पायी पार करावा लागतो. या भागात वनवासातील काही काळ रामाने घालविला होता असेही मानले जाते.

Leave a Comment