आंबोली – सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर विसावलेले गांव

दक्षिण महाराष्ट्रातील हिल स्टेशन आंबोली हे समुद्रसपाटीपासून ६८० मीटर उंचीवर असलेले ठिकाण लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. गोव्यात शिरण्यापूर्वीच किनारपट्टीवरील पश्चिम घाट सह्याद्री पर्वतरांगांत विसावलेले हे छोटेसे पण अतिशय सुंदर गांव जगातील एक इको हॉट स्पॉट म्हणूनही ओळखले जाते. येथील जंगलात अनेक तर्हेंची फुले, झाडे आणि वनस्पती पाहायला मिळतात. हिल स्टेशन म्हणून विकसित झाल्यापासून येथील जंगल मात्र कमी होत चालले आहे. हे केवळ हिलस्टेशन नाही तर ऐतिहासिक महत्त्व असलेले आंबोली गांवही आहे. ब्रिटीश काळात वेंगुर्ल्याच्या बंदरातून बेळगांवकडे दारूगोळा पुरवठा करणारा महत्त्वाचा मार्ग येथून जात होता.
Amboli-Ghat2
कृष्णा नदीच्या काठावरचे प्राचीन हिरण्यकेशी शिवमंदिर आवर्जून पाहावे असे. गुहेत उगम असलेले हे ठिकाण .आंबोली परिसरात १०८ शिवमंदिरे आहेत असे सांगितले जाते. त्यातील आत्तापर्यंत १२ मंदिरांचा शोध लागला आहे. आंबोलीला पाहायला खूप ठिकाणे नाहीत. मात्र पावसाळा संपता संपता गेले तर घाटात डोंगरकड्यांवरून कोसळणारे असंख्य धबधबे, ज्यात भिजण्याचा आनंद मनमुराद लुटता येतो असे, अनुभवायला मिळतात. त्याचबरोबर घाटाच्या दुसर्या  बाजूला असलेली दरी धुक्याने नुसती ओंथबून गेलेली असते.  दूरवर नुसते पायी भटकायचे, शांत प्रदूषण विरहित वातावरणात शरीर मन रिलॅक्स करायचे असेल तर आंबोलीला अवश्य जायला हवे.
Amboli-Ghat
सीव्ह्यू पॉईंट आणि महादेवगड पॉईंटलाही भेट द्यायला हवी बरं का! कोकण किनारपट्टीचे नयनमनोहर दर्शन येथून घडते. महादेवगड येथे एक पडीक किल्ला आहे. तसेच नागतारा धबधबाही पाहण्यासारखा. समुद्राचे दर्शन घडविणार्याक थोडक्या हिल स्टेशनमध्ये आंबोलीचा क्रमांक लागतो. राहण्यानिवासाच्या सोयी चांगल्या आहेत. महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे रिसॉर्टही आहे. घरगुती जेवणाचा आनंद लुटता येतो.गांव छोटेसे असल्याने फिरण्यासाठी स्थानिक रिक्षा, त्याही मोजक्याच आहेत , अगोदरच बुक कराव्यात. अन्यथा स्वतःचे वाहन असेल तर प्रश्नच मिटतो.
Amboli-Ghat1
आंबोलीचा घाट उतरून गेले की आपण थेट गोव्यात म्हणजे सावंतवाडीलाच पोंहोचतो. हे अंतर अवघे ९ किलोमीटर आहे. सावंतवाडीत जाऊन तेथली प्रसिद्ध लाकडी खेळणी आणि सावंतवाडीची बिस्कीटे मुद्दाम आणावीत अशा दर्जाची आहेत. कोल्हापूर, बेळगांव आणि पणजी कुठूनही आंबोलीला रस्त्याने जाता येते. दोन तीन दिवस या ठिकाणी राहिले तरी ताजेतवाने होऊन पुन्हा आपल्या रोजच्या धबडग्याला जुंपून घेता येते. ही एनर्जी सहा महिने तरी नक्की पुरते. पुन्हा कंटाळा आला की पुन्हा आंबोली गाठायचे. स्वस्त आणि मस्त असे हे ठिकाण सर्व आथिर्क स्तरांतील पर्यटकांना सहज परवडणारे आहे.

Leave a Comment