पुणे; इमारतीची संरक्षक भिंत कोसळल्याने १५ मजुरांचा दुर्दैवी अंत


पुणे – पुणे शहरातील कोंढवा परिसरात इमारतीची संरक्षक भिंत पत्र्याच्या खोल्यांवर कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. या दुर्घटनेत भिंतीच्या मलब्याखाली दबून १५ मजुरांचा दुर्दैवी अंत झाला. कोंढव्यातील सोमाजी पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी मध्यरात्रीनंतर ही घटना घडली. बिहार राज्यातील हे मजूर असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे. पण याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.

मजुरांसाठी पत्र्याच्या खोल्या कोंढव्यात कांचन कम्फर्ट इमारतीच्या विकासकाने बांधल्या आहेत. या खोल्यांवर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर शेजारच्या इमारतीची संरक्षक भिंत कोसळली. भिंत मोठी असून कामगारांच्या खोल्या खड्ड्यात असल्याने मोठ्या प्रमाणात भिंतीचा मलबा पडला आहे. यावेळी मजूर झोपेत असल्याने भिंतीच्या मलब्याखाली दबले गेले.घटनास्थळांवरून आतापर्यंत ५ मजुरांचे मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढलेले आहेत. या मृतदेहांना ससून रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचाही समावेश आहे.

दरम्यान पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी भिंत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या बांधकाम मजुरांच्या नातेवाईकांना सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी माहिती दिली. या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाणार असल्चाचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचबरोबर या घटनेची मुख्यमंत्र्यांनीसुद्धा गंभीर दखल घेत दोषींवर कारवाईचे आदेश दिले आहेत. तसेच या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रशासनातर्फे सर्वेतोपरी मदत करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे. त्याचबरोबर बचावकार्य अजूनही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान भिंत कोसळून 15 जणांचा नाहक बळी गेला असून या घटनेतील मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. बिहार येथील असून इमारत बांधकामासाठी हे सर्व कामगार पुण्यात आले होते. त्यामुळे पालिका प्रशासन की बिल्डर या घटनेला जवाबदार आहेत का? याचे उत्तर मात्र अनुत्तरित आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा जीव एवढा स्वस्त झाला आहे का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

या घटनेस जेवढे जबाबदार पालिका प्रशासन, तेवढीच जबाबदारी बिल्डरांचीदेखील आहे. त्यामुळे दोषींवर कारवाई होणार, की इतर घटनांप्रमाणेच या घटनेकडे प्रशासन कानाडोळा करणार, हे पाहणे महत्वाचे असेल. पुण्यात याआधीही संरक्षक भिंती कोसळण्याच्या घटना घडल्या असतानाही पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे या घटनेनंतर स्पष्ट झाले आहे.

Leave a Comment