प्लॅस्टिकपासून बनवले पेट्रोल, 1 लीटरची किंमत फक्त 40 रूपये

सध्या टेक्नोलॉजीबरोबरच लोकांचे जीवन देखील दिवसेंदिवस बदलत चालले आहे. रोज अनेक नवनवीन संशोधन होताना पाहायला मिळत आहेत. यातच पर्यावरणाची सुरक्षा हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. प्लॅस्टिकपासून पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत असून, पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. पर्यावरण वाचवण्यासाठी प्लॅस्टिकला रिसाइकल केले जात असून, प्लॅस्टिकपासून अनेक उपयोगी वस्तू देखील बनवल्या जात आहेत. याच टाकाऊ प्लॅस्टिकचा वापर करून पेट्रोल बनवण्याची किमया हैद्राबादच्या एका पठ्ठ्याने केली. माझा पेपरच्या वाचकांसाठी आज आम्ही याच खास व्यक्तीची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

हैद्राबादच्या एका शिक्षकाने प्लॅस्टिकपासून जे बनवले आहे, त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. हैद्राबादमध्ये राहणाऱ्या 45 वर्षीय प्रोफेसर सतीश कुमार यांनी प्लॅस्टिकपासून पेट्रोल बनवत सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. प्लॅस्टिकपासून पेट्रोल बनवण्याच्या या प्रक्रियेला त्यांनी ‘प्लॅस्टिक पायरोलीसिस’ असे नाव दिले आहे. सतीश कुमार यांनी हायड्रोक्सी प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी स्थापन केली आहे.

सतीश कुमार यांच्या म्हणण्यानुसार, प्लॅस्टिक पायरोलीसिस प्रक्रियाद्वारे प्लॅस्टिकपासून डिझेल, एविएशन फ्युल आणि पेट्रोल बनवले जाऊ शकते. जवळपास 500 किलोग्राम रिसाइकल न होणाऱ्या कचऱ्यापासून जवळपास 400 लीटर इंधनाचे उत्पादन केले जाऊ शकते. ही सोपी प्रक्रिया असून यात पाण्याचा वापर केला जात नाही. तसेच, घाण पाणी देखील निघत नाही. हवेचे देखील प्रदुषण होत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

सतीश कुमार यांनी 2016 पासून ते आतापर्यंत जवळपास 50 टन प्लॅस्टिकपासून पेट्रोल बनवले आहे. त्यांची कंपनी दर दिवशी 200 किलो प्लॅस्टिकपासून 200 लीटर पेट्रोल बनवते. ते हे पेट्रोल स्थानिक उद्योगांना लीटरमागे 40 ते 50 रूपयांमध्ये विकत आहेत. मात्र या इंधनाचा वापर वाहनांमध्ये केला जाऊ शकतो का नाही याचा प्रयोग अजून झालेला नाही.

Leave a Comment