सरपंचाने ‘आधार कार्ड’च्या मोबदल्यात केली शरीरसुखाची मागणी


नागपूर – एका असाहाय महिलेकडे सरपंचाने आधार कार्ड बनवून देतो असे आश्वासन देत शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादाय प्रकार नागपूर जिल्ह्यात घडला आहे. ही घटना रामटेक तालुक्यातील काचुरवाही गावातील असून सोशल मीडियात महिला आणि सरपंच शैलेश राऊत यांच्यातील बोलण्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. सरपंच राऊतला हे बोलणं व्हायरल झाल्यानंतर गावकऱ्यांनी चोप दिला तर पोलिसांनी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

काचुरवाहीत शैलेश राऊत हा सरपंच आहे. याच गावात एका महिलेचे आणि तिच्या नवऱ्याचे भांडण सुरू होते. त्यांच्या ओळखीचा शैलेश हा असल्याने त्याने त्यांच्यात समेट घडवून आणण्याचा बहाना करत महिलेशी सलगी करण्याचा प्रयत्न केला. तिला आधारकार्ड आणि रेशन कार्ड बनवून घे असा शैलेश सल्ला देत होता.

त्याने तिला आधार आणि रेशन कार्ड बनवले तर तू त्याच्या संपत्तीची अर्धी मालकीन होशील असेही सांगितले. पण तुला मी सांगतो ते याच्या बदल्यात द्यावे लागेल असेही तो तिला म्हणतो. त्याने तिला नवऱ्याच्या फोनवरून फोन करत जाऊ नको असेही सांगितले. एकदा आधारकार्ड तयार झाले की तुला काळजीचे कारण नाही. त्याने त्या महिलेला मी पैसे देऊन ते कार्ड तयार करून देतो असेही सांगितले.

गावातील लोकांनी ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर शैलेश राऊतला पकडून चोप दिला आणि रामकेट पोलिसात तक्रारही दिली. पोलिसांनी शैलेश विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. आता या प्रकरणानंतर शैलेश राऊतचे सरपंचपदही जाण्याची शक्यता आहे.

Leave a Comment