बायकोने सुद्धा दारू प्यावी म्हणून नवऱ्याची न्यायालयात धाव


भोपाळ: दारु पिण्यावरुन अनेकदा पती-पत्नीमध्ये भांडणे होत असतात हे आपण पाहिलेच असेल. त्यावरुन निर्माण झालेले वाद काहीवेळेस न्यायालयातही जातात. पतीच्या दारु पिण्याला कंटाळलेल्या महिला त्यासाठी कौटुंबिक न्यायालयात धाव घेतात. पण सध्या एका वेगळ्याच प्रकरणाची चर्चा भोपाळच्या कौटुंबिक न्यायालयात आहे. पत्नीने देखील दारु प्यावी यासाठी पतीने कौटुंबिक न्यायालय गाठले आहे. किमान कौटुंबिक कार्यक्रमात पत्नीने दारु प्यावी, अशी या पतीची इच्छा आहे.

समुपदेशक शैल अवस्थी यांनी न्यायालयात आलेले हे प्रकरण खूप वेगळे असल्याचे सांगितले. आतापर्यंत मी कधीच असे प्रकरण पाहिलेले नाही, असेदेखील ते पुढे म्हणाले. संबंधित कुटुंब मध्यमवर्गीय आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती साधारण आहे. पती खासगी कंपनीत नोकरी करतो. त्याचे आई, वडील, भाऊ, बहिण असे सगळेच मद्य सेवन करतात. त्याचे इतरही नातेवाईक कौटुंबिक कार्यक्रमात दारु पितात. पण त्याची पत्नी दारु पित नाही, असे अवस्थी यांनी सांगितलं.

या दाम्पत्यात लग्नानंतरचे काही दिवस वाद नव्हता. पण त्यानंतर सासरच्या व्यक्तींनी महिलेवर दारु पिण्यासाठी दबाव वाढवण्यास सुरुवात केली. आम्हाला कंपनी दे, यासाठी सक्ती केली जाऊ लागली. त्यानंतर वाद सुरू झाला. या दाम्पत्याला 9, 6 आणि 4 वर्षांची अपत्य आहेत. त्यांच्यात सुरुवातीला यावरुन लहानमोठ्या कुरबुरी व्हायच्या. पण त्यानंतर याचे रुपांतर भांडणांमध्ये होऊ लागल्यामुळे कौटुंबिक न्यायालयात त्यांनी धाव घेतली. हे दाम्पत्य सध्या समुपदेशकाची मदत घेत आहे.

Leave a Comment