वडिलांची पेंशन मिळावी म्हणून मुलाचे लिंगपरिवर्तन


एक अनोखे प्रकरण चेन्नईस्थित दक्षिण रेल्वेसमोर आले आहे. हे प्रकरण एवढे किचकट आहे की, चक्क ते सोडवण्यासाठी केंद्र सरकारला पत्र पाठवण्यात आले आहे. तर रेल्वेतील एका कामगाराच्या पेंशनबाबत हे प्रकरण आहे. या कामगाराच्या मुलाने या पेंशनवर आपला हक्क सांगण्यासाठी वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर, चक्क आपले लिंगपरिवर्तन केले आहे. हा मुलगा आता मुलगी बनला आहे. अशा प्रकारचा अजब प्रकार रेल्वेच्या गेल्या 160 वर्षांमध्ये पहिल्यांदाच घडला आहे. ही पेंशन आता या नव्या मुलीला द्यावी की नाही याबाबत विचार सुरु आहे.

या महिलेचे वडील रिटायर्ड रेल्वे कर्मचारी होते, 2017 मध्ये ज्यांचा मृत्यू झाला होता. रेल्वेच्या नियमानुसार, ही पेंशन मृत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना दिली जाते. 25 वर्षांपेक्षा कमी वयाची मुले आणि अविवाहित मुलींचाही यामध्ये समावेश होतो. सरकारी कर्मचा-यांचा मृत्यु झाल्यानंतर त्यांच्या पत्नीला ही पेंशन दिली जाते. दक्षिण रेल्वे ऑफिसमध्ये 2018 मध्ये या महिलेने पत्र लिहून पेंशनची मागणी केली होती. पण हे प्रकरण फारच वेगळे असल्याने कोणताही निर्णय रेल्वेने घेतला नाही. रेल्वेने हे पत्र केंद्रीय कामगार, पेंशन आणि लोक तक्रार मंत्रालयाला पाठवले आहे.

आपल्या याचिकामध्ये या महिलेने दावा केला आहे की, तो वडील जिवंत असल्यापासूनच महिलेचे जीवन जगत होता. तसेच अविवाहितही असल्यामुळे ही पेंशन त्याला मिळाली पाहिजे. केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता, 2009 मध्ये या व्यक्तिला तमिलनाडु ट्रान्झेंडर वेल्फेयर असोसिएशनकडून एक प्रमाणपत्र मिळाले असल्याचे दिसून आले. मात्र तृतीयपंथी व्यक्तिला पेंशन प्राप्त करण्याचा हक्क आहे की नाही याबाबत रेल्वेची द्विधा मनःस्थिती आहे.

Leave a Comment