लाईटइअर १, एका चार्जमध्ये ७२५ किमी धावणार ही सोलर कार


कोणताही ग्राहक कार खरेदी करताना प्रथम कार किती मायलेज देते याची माहिती घेतो. पेट्रोल, डीझेल बरोबर आता इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याकडे ग्राहकाचा कल वाढत चालला आहेच. याचवेळी एक नवीन सोलर कार सादर करण्यात आली असून लाईटईअर या कंपनीने त्यांची नवी सोलर कार लाईटईअर वन नावाने हॉलंड मध्ये मंगळवारी सादर केली आहे. या कारचे सर्वात मोठे वैशिष्ट म्हणजे ती एका चार्ज मध्ये चक्क ७२५ किमी अंतर तोडणार आहे. मायलेजच्या कारणावरून ही कार आत्ताच चर्चेत आली आहे. सोलर पॉवरवर इतके अंतर कापणारी ही जगातील पहिली कार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

या पाच सीटर कारच्या टपावर आणि बॉनेटवर ५ चौरस मीटरची सोलर पॅनल बसविली गेली असून ती वजनाला अगदी हलकी आहेत. ही पॅनल वजनाला हलकी असली तरी जलद गतीने पॉवर निर्माण करण्यास सक्षम आहेत. छतावर सेफ्टी ग्लास बसविली गेली आहे. ही काच इतकी मजबूत आहे कि माणूस उभा राहिला तरी त्यावर चरा येत नाही. या कारसाठी सोलर चार्ज बॅटरी तंत्रज्ञान वापरले गेले आहे. चारी चाकात चार इलेक्ट्रिक मोटर्स दिल्या गेल्या आहेत.


सूर्य असताना ड्रायविंग केले जात असेल तर कारचे सेल अपोआप चार्ज होत राहतात पण समजा ढग असतील तरी ही कार घरातील सॉकेटवर सुद्धा वीज वापरून चार्ज करता येणार आहे. त्यासाठी २३० व्होल्टचा प्लग पुरेसा ठरेल असे कंपनीचे म्हणणे आहे. रात्रभर विजेवर कार चार्ज केली तर ती ४०० किमी अंतर धावू शकेल. कंपनीने सध्या या कारचे प्रोटोटाइप सादर केले असून २०२१ पासून या कार विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. कंपनी सध्या अश्या ५०० कार्स तयार करणार असून त्यातील १०० कार्स साठी बुकिंग झाले असल्याचे सांगितले जात आहे.

या कारची किंमत १,३५,००० पौंड म्हणजे ९४ लाख रुपये असून अडव्हांस बुकिंग साठी सुमारे तीन चतुर्थांश रक्कम भरावी लागणार आहे. लाईटईअर कंपनी २०१६ मध्ये स्थापन करण्यात आली असून सध्या येथे १०० कर्मचारी आहेत. या कंपनीत टेस्ला, फेरारी मधून नोकरी सोडून इंजिनिअर्स आल्याचे समजते. कंपनीकडून असेही सांगण्यात आले आहे, कि नेदरलंड सारख्या देशात जेथे सूर्य कमी वेळ असतो तेथेही ही कार ४० टक्के सोलर पॉवर वापरून चार्ज होऊ शकेल.

Leave a Comment