वेस्ट इंडीजचे वादळ, क्रिस गेल घेणार क्रिकेट संन्यास


वेस्ट इंडीज संघातील तुफानी फलंदाज क्रिस गेल क्रिकेट मधून संन्यास घेणार आहे. सध्या इंग्लंड मध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड कप मध्ये तो सहभागी आहे आणि वर्ल्ड कप संपल्यावर क्रिकेट मधून निवृत्ती घेणार असल्याचे संकेत त्याने पूर्वी दिले होते. मात्र बुधवारी मिडियाशी बोलताना त्याने टीम इंडियाच्या वेस्ट इंडीज दौऱ्यामध्ये शेवटचा सामना खेळण्याची शक्यता बोलून दाखविली. भारताविरुद्ध शेवटचा सामना किंग्स्टन मैदानावर जमैका येथे होणार आहे, तो खेळून क्रिस क्रिकेटला अलविदा करेल असे सांगितले जात आहे.

क्रिस मीडियाशी बोलताना म्हणाला प्रथम त्याने वर्ल्ड कप नंतर निवृत्त होण्याचा विचार केला होता. मात्र आता आपले मन बदलले आहे असे सांगून तो म्हणाला, मी आणखी काही सामने, कदाचित एकादी सिरीज खेळू शकतो. वन डे तर नक्कीच खेळू शकतो. मात्र टी २० खेळणार नाही. भविष्यात काय करायचे याचा विचार अजून केलेला नाही. बघू पुढे काय होतेय. विंडीज क्रिकेट बोर्डाने ३९ वर्षीय गेल ला भारताविरुद्ध सिरीज खेळल्यावर निवृत्तीची परवानगी दिली तर शेवटचा सामना भारताविरोधात खेळून निवृत्त झालेल्या स्टीव्ह वॉ (२००४), जॅकस कॅलीन (२०१३), एलिस्टर कुक सारख्या महान खेळाडूंच्या यादीत क्रिस समाविष्ट होईल.


वेस्ट इंडीज मिडिया मॅनेजर फिलीप स्पूनर यांनी क्रिसच्या निवृत्तीच्या घोषणेला पुष्टी देताना भारताविरुध्दच्या सिरीजमधला शेवटचा सामना क्रिस गेलचा अखेरचा सामना असेल असे संकेत दिले. ते म्हणाले, विंडीज बोर्डासाठी भारताविरुध्च्या सिरीज मध्ये गेलचा सहभाग आर्थिक दृष्टीनेही महत्वाचा आहे.

क्रिसचा यंदाच्या वर्ल्ड कप मधील खेळ त्याच्या लौकिकाला साजेसा झालेला नाही. त्याने ६ सामन्यात १९४ धावा काढल्या आहेत. त्यात दोन अर्धशतके आहेत आणि त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे ८७. क्रिसने त्याच्या कारकिर्दीत १०३ कसोटीत ४२.१९ च्या सरासरीने ७२१५ धावा काढल्या आहेत. २६४ वनडे मध्ये त्याच्या १०३४५ धावा असून टी२० मध्ये ५८ सामन्यात त्याने १६२७ धावा काढल्या आहेत.

Leave a Comment