भगवान जगदिशांची तब्येत सुधारली, भक्तांच्या दर्शनासाठी सज्ज


भारत हा विविधतेने नटलेला देश आहे तसेच अनेक मंदिरे, देवळे असलेला देशही आहे. येथे देवावर श्रद्धा असलेल्यांची संख्या मोठी आहे आणि त्यामुळे येथील अनेक मंदिरात काही परंपरा प्राचीन काळापासून पाळल्या जातात. त्यात अंधश्रद्धा किती हा भाग सोडला तरी माणसाने देवाला आपल्यातलेच एक मानल्याचे दर्शन नक्की घडते. शेवटी आयुष्यातील ताणतणाव आणि संकटांना तोंड देण्याची लढाई रोजच लढत असलेल्या लोकांना देव आपल्यासारखाच आहे, त्यालाही अडचणी येतात हा मोठा दिलासा असतो आणि विविध परंपरा मधून ते सांगण्याचा प्रयत्न असतो.


राजस्तानाच्या कोटा मधील रामपुरा जगदीश मंदिरात अशीच एक परंपरा पाळली जाते. त्यानुसार भगवान जगदीश भरपेट आंबे खाल्ल्याने, कडक उन्हात गार पाण्याने अंघोळ केल्याने आजारी पडतात. त्यांच्यावर १५ दिवस वैद्य जडीबुटी, तुळस, लवंग यांनी उपचार करतात. १५ दिवस देवांना सक्त विश्रांती दिली जाते. या काळात भाविकांना दर्शन घेता येत नाही. इतकेच नव्हे तर देवाला आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून देवळातील घंटा कापडाने बांधल्या जातात. या काळात देवाची पूजा, आरती केली जात नाही. पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर भगवान ताजेतवाने होतात आणि भाविकांना दर्शन देण्यासाठी सज्ज होतात.

पौर्णिमेनंतर स्नान झाल्यावर यंदा भगवान जगदिशांना यंदा २०० किलो आमरसाचा नैवेद्य दाखविला गेला आणि त्यामुळे जगदीश आजारी पडले. त्यामुळे ७ जून नंतर भगवान जगदीश, बलराम आणि सुभद्रा यांच्यावर उपचार सुरु झाले. त्यांना खोलीत आराम करण्यासाठी नेले गेले आणि रोज फक्त वैद्य येऊन औषध देत राहिले. वैद्यांनी बेडरेस्ट सांगितल्याने भाविकांना दर्शन बंद झाले. मात्र १५ दिवसात भगवान पूर्ववत झाले आणि २५ जून रोजी रथयात्रा काढून त्यांना गावातून फिरविले गेले.


येथील पुजारी कमलेश दुबे सांगतात, ही प्राचीन परंपरा आहे. पुरी जगन्नाथ मंदिरात सुद्धा अशीच परंपरा पाळली जाते. भगवान सर्व भक्तांची काळजी घेत असतात त्यामुळे त्यांना श्रम होतात आणि ते थकतात. त्यामुळे त्यानाही विश्रांती गरजेची असते अशी या मागे भावना आहे. १५ दिवस विश्रांती झाल्यावर या मंदिराची दारे २३ जून रोजी थोड्या वेळासाठी उघडली गेली. तेव्हा भाविकांना नेत्रदर्शन करता आले आणि २५ जून रोजी सकाळी रथयात्रा सुरु झाली. आता वर्षभर भगवान भाविकांच्या कल्याणासाठी सज्ज झाले आहेत.

Leave a Comment