मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याने पाणीपट्टीच नाही तर मालमत्ताकरही थकवला


मुंबई : 7 लाख 44 हजार रुपयांचे मुख्यमंत्र्यांचे मलबार हिल येथील निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्याचे पाणी बिल थकवल्याचे प्रकरण सध्या ताजे असतानाच या बंगल्याचा मालमत्ता करही आता थकित असल्याची माहिती समोर आली आहे. सत्तेत भाजप आणि शिवसेना युतीचे सरकार आल्यापासून आतापर्यंतची 7.03 लाख रुपयांची मालमत्ता कर थकबाकी आहे.

शिवसेना आणि त्यापाठोपाठ भाजपनेही मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान 500 चौरस फुटांच्या घरात राहणाऱ्या नागरिकांना मालमत्ता कर माफ करण्याचे आश्वासन दिले होते. राज्य सरकारने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मालमत्ता करमाफीची घोषणा केली. पण मालमत्ता कराच्या देयकामधील केवळ सर्वसाधारण कर माफ झाला आहे.

पालिकेने मालमत्ता कराचा भरणा न करणाऱ्या अनेकांना नोटीस बजावली असून त्यानुसार कर वसुलीची प्रक्रिया देखील सुरु केली आहे. तर दुसरीकडे खुद्द मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाचा मालमत्ता कर थकीत आहे. वर्षांकाठी ‘वर्षा’ निवासस्थानाच्या क्षेत्रफळानुसार मालमत्ता करापोटी राज्य सरकारकडून पालिकेकडे 1 लाख 63 हजार 144 रुपये जमा करणे क्रमप्राप्त आहे.

दर सहा महिन्यांनी महापालिका मालमत्ता कराची देयके जारी करत असते. ऑक्टोबर 2014 पासून ऑक्टोबर 2018 या काळात पालिकेने मालमत्ता कराची नऊ देयके जारी केली. पण भाजप-शिवसेनेचे सरकार सत्तेत आल्यापासून आजतागायत ‘वर्षा’ निवासस्थानाचा मालमत्ता कर पालिकेच्या तिजोरीत जमा करण्यात आलेला नाही.

Leave a Comment