राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम


नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राजीनामा देण्याच्याच मन: स्थितीत आहेत. पण पक्षाच्या नेत्यांची त्यांनी राजीनामा देऊ नये अशी इच्छा आहे पण राहुल गांधी मात्र आपल्या निर्णयावर ठाम आहेत.

काँग्रेसच्या नेत्यांची एक बैठक काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांनी बोलावली होती. यामध्ये मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधींना अध्यक्षपदी राहून काँग्रेसचे नेतृत्व सुरू ठेवण्याची विनंती काँग्रेस नेते शशी थरुर आणि मनीष तिवारी यांनी केली. एकाच व्यक्तीवर पराभवाची जबाबदारी टाकून चालणार नाही, असे त्यांचे म्हणणे होते. पण माझा निर्णय आता झाला आहे आणि मी त्यावर ठाम असल्याचे राहुल गांधींनी त्यांना सांगितले, अशी सूत्रांची माहिती आहे.

आता महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणुका आहेत. राहुल गांधींनी या निवडणुकांची रणनीती ठरवण्यासाठी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली होती. त्यामुळे राहुल गांधी अध्यक्षपदी कायम राहणार, अशी चर्चा सुरू झाली होती. पण राहुल गांधी राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम आहेत,असेच दिसते.

काँग्रेस कार्यकारिणीची लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर 25 मे रोजी बैठक झाली. राहुल गांधींनी यामध्ये राजीनामा देऊ केला होता. कार्यकारिणीने त्यावेळेस एकमताने त्यांचा राजीनामा नाकारला. राहुल गांधीच काँग्रेसचे अध्यक्ष राहतील,असे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकारांना सांगितले होते.

Leave a Comment