शिरुरमधील लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी


पुणे : यंदाची लोकसभा निवडणूक शिरूरमध्ये अत्यंत चुरशीची झाली. राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे यांनी या निवडणुकीत शिवसेनेचा अभेद्द समजला जाणारा हा बालेकिल्ला सर केला. 58483 मतांनी डॉ. अमोल कोल्हे हे विजयी झाले. हा पराभव शिवसेनेला चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. कारण आता पक्षाची शिस्तभंग केल्याचा आरोप करत अनेक पदाधिकाऱ्यांची शिवसेनेने हकालपट्टी केली आहे.

पक्षाने जुन्नरमधील शिवसेनेच्या नेत्या आणि जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके यांची हकालपट्टी केली आहे. आढळराव पाटील यांना लोकसभा निवडणुकीत मदत न केल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. शिवसेनेने आशा बुचके यांच्यासह इतरही काही पदाधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे.

दरम्यान, विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावरच या निवडणुकीत शिवसेनेची मदार होती. याआधी 3 वेळा खासदार म्हणून शिवाजीराव आढळराव निवडून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्याविरुद्ध डॉ. अमोल कोल्हेंना उमेदवारी दिल्यामुळे या दोघांमध्ये थेट लढत झाली. राष्ट्रवादीचे संघटन आणि स्वत:ची प्रतिमा यासोबत अमोल कोल्हे जिंकून येण्यामागे इतरही अनेक कारणे आहेत.

प्रतिस्पर्धी उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे एक वक्तव्य अमोल कोल्हेंच्या विजयामागील सर्वात मोठे कारण ठरले. अमोल कोल्हे यांची राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केल्यानंतर एका प्रश्नाला उत्तर देताना आढळराव पाटील यांनी थेट अमोल कोल्हेंच्या जातीचा उल्लेख केला.

एका तगडा मराठा उमेदवार तुमच्याविरोधात देण्यात आला आहे, त्यावर तुमचे मत काय?’ असा प्रश्न आढळराव यांना विचारण्यात आला होता. आढळराव यांनी त्यावर उत्तर देताना थेट अमोल कोल्हेंच्या जातीचा उल्लेख करत ते माळी समाजाचे असल्याचे सांगितल्यामुळे आढळरावांनी निवडणुकीत फायदा उठवण्यासाठी जातीचे राजकारण केल्याची चर्चा सुरू झाली. याचाच आढळराव यांना मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे.

मराठा समाजापाठोपाठ माळी समाजाचीही लक्षणीय संख्या शिरूर लोकसभा मतदारसंघात आहे. अमोल कोल्हे यांनी मालिकेतून छत्रपती शिवरायांची आणि छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली असल्याने मराठा समाजासह सर्वच समाजात त्यांची चांगली प्रतिमा असल्यामुळे अमोल कोल्हे यांच्या जातीचा उल्लेख करणे आढळराव यांना महागात पडल्याचे निकालातून दिसून आले.

Leave a Comment