ब्रायन लारावर मुंबईत अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया


वेस्ट इंडीजचा माजी धडाकेबाज फलंदाज ब्रायन लारा याच्यावर मंगळवारी मुंबईच्या ग्लोबल रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली असून त्याची तब्येत चांगली असल्याचे सांगितले जात आहे. मंगळवारी ब्रायन लाराला अचानक छातीत दुखू लागल्याने ग्लोबल रुग्णालयात हलविले गेले तेव्हा त्याची तपासणी करून त्वरित शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला गेला. रुग्णालयातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. प्रकाश कुलकर्णी यांनी लारावर अँजिओप्लास्टी केली असे समजते. हॉस्पिटलने या संदर्भात कोणतीही माहिती अद्यापी दिलेली नाही मात्र लारा यांनीच या संदर्भात ऑडीओ संदेश जारी केला आहे.

लारा यांच्या म्हणण्यानुसार मंगळवारी सकाळी जिम मध्ये वर्कआउट करत असताना त्याच्या छातीत अचानक दुखू लागले आणि त्याला अस्वस्थ वाटू लागले तेव्हा रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला गेला. तेथे आवश्यक तपासण्या आणि चाचण्या केल्या गेल्या. आता तब्येतीत सुधारणा असून बुधवारी रुग्णालयातून परत हॉटेल मध्ये येईन असे त्यांनी म्हटले आहे. लारा मुंबईत आयोजित केल्या गेलेल्या एका कार्यक्रमासाठी आला होता. तो सध्या आयसीसी वर्ल्ड कप २०१९ मध्ये समालोचक म्हणून स्टार्स स्पोर्ट्स साठी काम करत असून त्याच्यासोबत सचिन तेंडूलकर, सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग हेही कॉमेंट्री करत आहेत.

हॉस्पिटलमध्ये दाखल असतानाही लारा क्रिकेटच्या संपर्कात आहे. ऑडीओ मेसेज मध्ये त्याने बेडवर पडून इंग्लंड ऑस्ट्रेलिया सामना पाहत आहे असे म्हटले आहे. तो म्हणतो, माझा फोन सतत वाजतोय त्यामुळे स्वीच ऑफ करतोय. पण मी बरा आहे. डॉक्टरने काळजी करण्याचे कारण नाही असे सांगितले आहे.

लाराच्या नावावर फर्स्ट क्लास क्रिकेट मध्ये हाय्येस्ट स्कोर असून त्याने नाबाद ५०१ धावा काढल्या होत्या. टेस्ट इनिंग मध्येही त्याच्या नावावर हाय्येस्ट वैयक्तिक स्कोर नाबाद ४०० धावा आहे. इंग्लंड विरुद्ध खेळताना त्याने या धावा काढल्या होत्या. त्याने २००७ मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून शेवटचा सामना इंग्लंड विरुद्ध २१ एप्रिल २००७ मध्ये खेळला होता. लारा क्रिकेट जगतात द प्रिन्स नावाने ओळखला जातो.

Leave a Comment